नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण २० विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित मंत्रिपरिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल, अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यांवर चर्चा, सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असे कामकाज होणार असून त्यासोबत जवळपास वीस विधयेके मांडण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरिता मतदान केले आहे, म्हणून आमचे सरकार हे ‘ईव्हीएम’ सरकार आहे, पण त्या ईव्हीएमचा अर्थ ‘एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र’ असा आहे. आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घडविण्याकरिता या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कामकाज करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसासाठी भावांतर योजना राबवून बाजारभाव व हमीभाव यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. तसेच धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी 20 हजार रुपये दिले. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणारे शासन आहे, असेही त्यांनी सांगितले.
परभणीमधील घटना ही एका मनोरुग्णामुळे घडली असून मनोरुग्णाच्या कृत्यावर कोणतेही असंविधानिक उद्रेक करणे योग्य नाही. हे शासन संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे आहे. संविधानाच्या बाहेर तसूभरही वेगळे काम करणार नाही. आमचे सरकार संविधानाचा गौरव करणारे आहे. बीड जिल्ह्यातील घटनेची विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून आरोपी कोणीही असले तरी त्यांना सोडले जाणार नाही. अशा घटना महाराष्ट्रात गांभीर्यानेच घेतल्या जातात व यापुढेही घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’साठी काम करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आम्ही मागील अडीच वर्षे टीम म्हणून काम केले आहे. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रति आम्ही उत्तरदायी आहोत. ‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहोत. शेतकऱ्यांच्या, जनतेच्या हिताचे प्रकल्प सुरू करून त्यांना चालना दिली. एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना यांची सांगड घातली. लोकाभिमुख आणि गतिमान शासन आणून यापुढेही गतिमानतेने निर्णय घेऊ. या पुढील काळात सर्वसामान्य जनतेसाठी व राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यास महाराष्ट्र शासन हातभार लावणार आहे.
जनतेच्या विश्वासाला पात्र राहून सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार – अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्याला पात्र राहून महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न चर्चेला आले तर त्यावर निश्चितपणे उत्तर दिले जाईल. विरोधकांचा योग्य सन्मान ठेवला जाईल. मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी झालेल्या चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवनियुक्त मंत्री, विधीमंडळ सदस्य उपस्थित होते.