विशेष प्रतिनिधी, मुंबई
बाहुबली फेम सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास याचा खूपच मोठा फॅनफॉलोअर्स आहेत. बाहुबली मालिकेनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. प्रभासच्या नव्या चित्रपटांसाठी फॅन्स नेहमीच आतुर झालेले असतात. प्रभासच्या एका निर्णयामुळे त्याच्या फॅन्सना आश्चर्यचकित केले आहे. एका वृत्तानुसार गेल्या एका वर्षात प्रभासने जवळपास १५० कोटी रुपयांच्या जाहिराती (ब्रँड एंडोर्समेंट) सोडून दिल्या आहेत.
पिंक व्हिलाच्या वृत्तानुसार, प्रभासने जाहिरातीचे पैसे घेतलेले नसून, त्यावर तो खुलेपणाने व्यक्त होतो. आपल्या व्यक्तिमत्वावर तो विशेष लक्ष देत असतो. मोठ्या फॅनफॉलोअरवर परिणाम होत असल्याने तो जाहिरातीचे ब्रँड्सच्या निवडीसाठी अतिरिक्त सतर्कता बाळगतो. त्यामुळे त्याने गेल्या वर्षभरात १५० कोटींच्या जाहिराती सोडून दिल्या आहेत.
दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटात प्रभास श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान असेल. सनी सिंह लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. कृती सेनन सीतेच्या रूपात पाहायला मिळणार आहे. प्रभास आणि सैफ यांच्या भूमिकेवर आधीच शिक्कामोर्तब झाले होते. सनी आणि कृतीच्या भूमिकेबाबत मार्चमध्ये घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
प्रभासचा राधेश्याम या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये पूजा हेगडे नायिका असेल. हा चित्रपट तामिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. बाहुबली-द कन्क्लूजन या चित्रपटानंतर प्रभासचा साहो हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. आदिपुरुष शिवाय प्रभास सालार या चित्रपटातही काम करत असून, त्याचे चित्रीकरण सुरू आहे. केजीएफ चॅप्टर २ चे दिग्दर्शक प्रशांत नील सालारचेही दिग्दर्शन करत आहे. श्रुती हसन यामध्ये नायिका असेल. हा सिनेमासुद्धा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.