निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हा पंचायत समितीचे आरक्षण आज जाहीर झाले आहेत. त्यात 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गण यांच्याही आरक्षणाचा समावेश आहे. यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तर काहींना अनपेक्षितपणे लॉटरी लागली आहे. या आरक्षण सोडतीचा मोठा परिणाम नजिकच्या काळाक पहायला मिळणार आहे.
बागलाण तालुका प्रामुख्याने आरम आणि मोसम अश्या दोन भागात विभागला गेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण सोडत नंतर तालुक्याची राजकीय स्थिती काहीशी वेगळी झाली आहे. या आरक्षण सोडतीत अनेक बड्या इच्छुकांना घरी बसण्याची वेळ आली आहे. तर काही अनपेक्षित चेहऱ्यांना या आरक्षणामुळे निवडणूक लढण्याची संधी चालून आली आहे.
तालुक्यात राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजले जाणारे ब्राम्हणगाव, ठेंगोडा, विरगाव, हे गट अनुसूचित जमाती(ST) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या गटांमध्ये इच्छुक असलेल्या मातब्बरांना या आरक्षणा मुळे थांबावे लागणार आहे. तर नामपुर हा गट नागरिकांच्या खुल्या प्रवर्गासाठी(ओबीसी) राखीव झाल्याने या ठिकाणी इच्छुकांची रेलचेल वाढणार असली तरी या गटात जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य व माजी शिक्षण आरोग्य सभापती यतीन पगार यांना परत जिल्हा परिषदेत जाण्याची संधी चालून आली आहे.
ब्राम्हणगाव गटात भाजपा नेते डॉ. विलास बच्छाव यांच्या सौभाग्यवती विद्यमान जि. प .सदस्य असलेल्या लता बच्छाव यांना मात्र या निवडणुकीत आता थांबावे लागणार आहे. तर याच गटात प्रबळ दावेदार समजले जाणारे बागलाणच्या राजकारणातील चाणक्य म्हणुन ज्यांना ओळखले जाते ते माजी जि. प. सदस्य प्रशांत(पप्पू) बच्छाव यांना ही या आरक्षणामुळे थांबावे लागणार आहे.
विरगाव गटात गत वेळेस भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडुन आलेल्या साधना गवळी यांना परत लॉटरी लागली असून त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या गटांमध्ये अनेक इच्छुक असतांना आरक्षण सोडतीमुळे बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर देवरे, सभापती पंकज ठाकरे, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. ताहराबाद गट खुला झाल्याने इथे इच्छुकांची गर्दी वाढणार आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत सोनवणे, काँग्रेसचे सचिन कोठावदे, शिवसेनेचे सुभाष नंदन, अरुण भामरे, नाना भामरे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष किशोर भामरे, संजय भामरे आदी इच्छुकांची भाऊगर्दी या गटात पाहवयास मिळणार आहे. तर संपुर्ण आदिवासी बहुल भाग व मतदार म्हणुन नव्याने निर्मिती झालेल्या मुल्हेर जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण स्त्री राखीव जागा असल्याने या ठिकाणी आदिवासी उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार अपेक्षित असलेले पठावे गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गणेश आहिरे, माजी जि प सदस्य पोपट आहिरे यांना थांबावे लागणार आहे. या गटात आता आदिवसी नेतृत्वातील महिला उमेदवारी करते की बाहेरील उमेदवार या ठिकणी उमेदवारी करतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जायखेडा हा आमदार दिलीप बोरसे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा जिल्हा परिषद गट अनुसुचित जमाती(st)स्त्री राखीव झाल्याने या ठिकाणी इच्छुक असलेले आमदार पुत्र राजवर्धन(बंटी)बोरसे यांचा हिरमोड झाला आहे. या ठिकाणी आमदार बोरसे आपल्या कार्यकर्त्यां पैकी कोणाला उभे करतात की घरातील महिला उमेदवाराला पुढे करतात.यावरच जायखेडा गटाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पठावे ऐवजी डांगसौंदाणे जिल्हा परिषद गटाची निर्मिती झाली असुन हा गट सर्वसाधारण स्त्री साठी राखीव झाल्याने या गटाच्या माजी जिल्हापरिषद सदस्य सिंधुताई सोनवणे यांचा आश्या पल्लवीत झाल्या आहेत. या गटात संजय सोनवणे हे उत्सुक असताना गट महिला राखीव झाल्याने त्याना आता आपल्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.या गटातून जोरण येथील कडू बेडीस, डांगसौंदाणेचे रवींद्र सोनवणे हे ही इच्छुक होते.
गेली अनेक दिवस गटात मोर्चेबांधणी करणारे बेडीस व सोनवणे आपल्या घरातील महिला उमेदवाराला उभे करतात की अन्य उमेदवार उभे करून सिंधुताई सोनवणेना आवहान देतात या कडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष राहणार आहे. ठेंगोडा गटाच्या विद्यमान सदस्य असलेला मीना मोरे यांना आरक्षण बदलामुळे थांबावे लागणार आहे. या गटात अनेक जण इच्छुक असतांना हा ही गट राखीव झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
Baglan ZP Panchayat Samiti Reservation Impact Analysis