निलेश गौतम
डांगसौंदाणे – दर चार वर्षांनी येणारी पंचायत राज कमेटीचा जिल्हा दौरा निश्चिंत झाल्यावर जिल्हाभरात स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार एकदम जलद गतीने सूरु असल्याचे चित्र या आठवड्यात पहावयास मिळते आहे. जिल्ह्यात तीन दिवस येणाऱ्या या कमेटीतील सदस्य, अधिकारी मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे सर्वच विभाग प्रमुखाना तारेवरची कसरत करावी लागत आहे .एरवी संपूर्ण तालुक्याची मुख्य अर्थ वाहिनी असलेल्या पंचायत समितीला यानिमित्त झळाकी येतांना दिसत असून स्वच्छतेसह रंगरंगोटी ,विभागप्रमुखांच्या कार्यालालाला नावे, सभापती दालन, अशी सर्वच कामे जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तर येणाऱ्या कमेटीच्याच्या स्वागतासाठी आवारात मोठा मंडप देण्यात आला आहे. सर्वच अधिकरी सप्ताहभर आपआपल्या कार्यालयात स्थान मांडून बसले असून दप्तराची आवराआवर करताना कर्मचारी वर्ग दिसून येत आहेत. पंचायत राज कमेटी अर्थात (पी .आर. सी )कमेटी ला अनन्य साधारण महत्व असून या दरम्यान कमेटीचे मेंबर कुठल्याही विभागाची सखोल माहिती घेऊन आढावा घेऊ शकतात. तर काही तक्रारी असल्या तरी त्याचे त्याच ठिकाणी, निराकरण करण्यात येऊन दोषींवर कार्यवाही करण्याचा अधिकार या कमेटीला आहे. कमेटीत येणाऱ्या लोकप्रतिनिधींची सर्वच व्यवस्था स्थानिक पदाधिकारीसह गटविकास अधिकारी व विभाग प्रमुखांना करावी लागणार आहे. या दरम्यान ही समिती तालुक्यातील अन्य ग्रामपंचायत अथवा विकासकांमाना भेटी देऊन पाहणी करू शकते या मुळे गावोगावी ग्रामसेवक ,सरपंच मंडळी अलर्ट असुन कमेटी ऐनवेळेस कुठल्याही ग्रामपंचायत मध्ये येण्याची शक्यता असल्याने सर्वच ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी पूर्णवेळ कार्यालयात बसून आहेत. या समितीची अतिथी देवो भाव या उक्ती प्रमाणे स्वागत समारंभ साठी पंचायत समिती आवारात व्यवस्था करण्यात आली असून प्रभारी सभापती ज्योती आहिरे ,गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत काथेपूरी, व सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी यांनी नियोजन केले आहे. उद्या २७ रोजी येणारी ही कमेटी कुठे कुठे भेट देते याकडे तालुका वासीयांचे लक्ष लागले आहे .