इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज पूर्वी केवळ बागेश्वर धाम आणि आसपासच्या राज्यांपूरताच मर्यादित होते. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्यांना आव्हान दिल्यानंतर ते सर्वांना परिचित झाले. त्यांची ओळख संपूर्ण देशाला झाली. त्यामुळे त्यांनी कुठलेही विधान केले की त्याचे बरे-वाईट परिणाम बघायला मिळतात. अलीकडेच त्यांनी शिर्डीचे संत साईबाबा यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून भाविकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.
मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये धीरेंद्र शास्त्री यांचे पारायण अलीकडेच आयोजित करण्यात आले. पारायणाच्या शेवटच्या दिवशी भाविकांच्या शंकांचे समाधान ते करीत होते. त्याचवेळी भाविकांना पडलेल्या अनेक प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली. खरे तर पारायणाला येणारे लोक स्वतःच्या आयुष्यातील व्यक्तिगत समस्या मांडत असतात. पण अशात एकाने धीरेंद्र शास्त्रींना असा प्रश्न विचारला की त्याच्या उत्तराने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले.
‘साईबाबांची पुजा करावी की करू नये?’ असा प्रश्न उपस्थिताने केला. त्यावर साईबाबा संत होते, त्यांना आपण फकीर म्हणू शकतो, युगपुरुष म्हणू शकतो… पण ते ईश्वर नाहीत, असे वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले. त्यांच्या या विधानावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मिडियावर काही लोक त्यांच्या बाजुने बोलत आहेत तर साईबाबांचा भक्त समूदाय धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानाचा निषेध करीत आहेत.
गीदड की खाल…
धीरेंद्र शास्त्रींना साईबाबांबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी जे विधान केले त्यावरूनच मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. ‘गीदड की खाल ओढकर कोई शेर नहीं बन सकता’, असे विधान त्यांनी साईबाबांच्या बाबतीत केले.
शंकराचार्य धर्माचे पंतप्रधान
शंकराचार्यां साईबाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. त्यांच्या मताचे पालन करणे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही संत असतील… ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. गिधाडाचे चामडे पांघरून कोणी सिंह होत नाही. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही, असे वादग्रस्त विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केले.