इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री चर्चेत आहेत. त्यांच्या दिव्य दरबारने सर्वत्र खळबळ माजविलेली आहे. या पार्श्वभूमीवर धीरेंद्रशास्त्री यांना आव्हान देत दोन कोटीच्या हिऱ्यांची ऑफर करणाऱ्या व्यापाऱ्याने आता माघार घेतली आहे.
धीरेंद्र शास्त्री गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट आणि सुरत या ठिकाणी भव्य दरबार घेणार आहेत. बिहारपाठोपाठ गुजरातमध्ये धीरेंद्र शास्त्री यांच्या दौऱ्याला विरोध होत आहेत. यातच सुरत येथील जनक बाबरिया या हिरे व्यापाऱ्याने शास्त्री यांना एक आव्हान दिले आहे. मला त्यांच्या भव्य दरबारात बोलावले गेले, तर पॉलिश केलेल्या हिन्यांचे एक पाकीट घेऊन तिथे जाईन. त्या पाकिटात किती पॉलिश केलेले हिरे आहेत, हे त्यांनी ओळखून दाखवले तर २ कोटी रूपयांच्या हिरे तिथे अर्पण करेन. त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे मान्य करेन, असे आव्हान जनक यांनी दिले होते. मात्र, आता यावरून जनक यांनी यु टर्न घेतला आहे. या आव्हानानंतर जनक प्रसिद्धीझोतात आले.
प्रसारमाध्यमांशी बोलतानाही जनक आव्हानाचा पुनरुच्चार करत होते. मात्र, यानंतर आता जनक यांनी एक पत्र लिहिले आहे. धीरेंद्र शास्त्री यांना दिलेल्या चॅलेंजवरून बराच वाद सुरू झाला आहे. गुजरातमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. या वादामुळे आपला मानसिक छळ होत आहे. अशा परिस्थितीत आता आपल्याला हे प्रकरण संपवायचे आहे. या वादानंतर आपल्याला सतत फोन येत आहेत. यामुळे हा वाद इथेच संपवत आहे. येत्या काही दिवसांत मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे जाऊन धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे जनक यांनी या पत्रात म्हटले आहे.
Bageshwar Baba 2 Crore Diamond Offer Trader