नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मध्यप्रदेशातील धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा संतधाम नावाने पंचवटीतील तपोवनात गुरुवारी कार्यक्रम होणार असल्याचा ईमेजसह मेसेज सोशल मीडियातून फिरत आहे. ही बाब लक्षात घेऊन, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन नाशिक येथील महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त नाशिक यांना सादर केले आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे की,धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे महाराष्ट्रात येऊन धर्माच्या आडून अध्यात्माच्या नावाने अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या अवैज्ञानिक व चमत्कार सदृश्य गोष्टींचे दावे करतात. त्यामध्ये ते भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य सर्रास नाकारून समाजात चमत्काराचा प्रचार, प्रसार करतात. त्यांना स्वतःला प्राप्त झालेल्या दैवी कृपेमुळे ते लोकांच्या मनातील भावना, इच्छा, प्रश्न समस्या ओळखतात. कागदावर लिहितात आणि त्यावर दैवी तोडगेही सुचवतात. त्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा फैलावण्यास आणखी बढावा मिळतो, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाम मत व म्हणणे आहे. सोशल मीडियामध्ये उपलब्ध असलेल्या युट्युबवर याची कुणीही खात्री करू घेऊ शकते.
महाराष्ट्राला थोर संत – समाजसुधारकांची कृतीशील विचारसरणीची परंपरा आहे. अवैज्ञानिक, दैवीतोडगे व चमत्काराचे दावे करणारे धिरेंद्र शास्त्री हे या सर्व संत ,समाजसुधारकांचा अपमान करीत असतात. यापूर्वीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबा यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचे थोर संत, संत तुकाराम आणि काही महापुरुषांबद्दलही अतिशय अवमानकारक शब्दांची गरळ ओकलेली आहे.
त्याचबरोबर त्यांच्या या अवैज्ञानिक आणि चमत्कार सदृश्य दाव्यांमुळे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट ,अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम २०१३, या कायद्याचे सर्रास उल्लंघन होते. तरीही धार्मिकतेच्या नावाखाली ह्या बुवाला पुन्हा नाशिकमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी कशी काय देण्यात येते , अशा आशयाचा प्रश्न निवेदनात विचारण्यात आला आहे.
धीरेंद्र कृष्णशास्त्री हे त्यांच्या तथाकथित धार्मिक कार्यक्रमांमध्ये जे चमत्कारांचे दावे करतात, ते दावे त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर सिद्ध करावेत आणि महाराष्ट्र अंनिसने यासाठी ठेवलेले एकवीस लाख रूपयांचे पारितोषिक त्यांनी मिळवावे, असे जाहीर लेखी आव्हान त्यांना साधारण वर्षभरापूर्वीच रजिस्टर पोस्टाने महाराष्ट्र अंनिसच्या वतीने पाठवण्यात आलेले आहे. मात्र त्यांनी हे आव्हान स्वीकारल्याचे अद्याप कळविले नाही.
नाशिक शहरांमध्ये गुरुवार दिनांक १४/११/२०२४ रोजी तपोवन येथे ‘संत सभा’ नावाच्या कार्यक्रमासाठी ते येत आहेत. दुपारी चार ते रात्री नऊ ह्या वेळात हा कार्यक्रम होणार आहे. तसा मेसेज सोशल मीडियातून फिरत आहे. खरंतर, सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण असताना असा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पोलिसांनी ह्या कार्यक्रमासाठी कोणत्या कायद्याच्या कलमान्वये परवानगी दिली, असाही प्रश्न अंनिसला सतावतो आहे. म्हणून धर्माच्या नावाखाली अनेक अवैज्ञानिक आणि चमत्कार सदृश्य दावे करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम यांचा नाशिक येथे गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणारा कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात यावा,अशी मागणी अंनिसने केली आहे.
निवेदनावर महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ ठकसेन गोराणे , जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे,वैभव देशमुख, अरूण घोडेराव, विजय खंडेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.