नीलेश गौतम,सटाणा
बागलाण तालुक्यातील टिंगरी येथील एका गरीब आदिवासी कुटुंबियांच्या घराला लागलेली आग ही सुशिलाबाई बाबूलाल माळी (४२) यांच्या जिवनात केवळ भौतिक हानी नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरवणारी घटना ठरली. एका गरीब कुटुंबाच्या संसारावर काळाने झडप घातली होती. घर जळालं, साऱ्या कागदपत्रांची राख झाली आणि त्यातच या महिलेच्या तब्येतीची गंभीर अवस्था उघड झाली – तिचं पोट प्रचंड फुगलेलं होतं, वेदनेने त्रस्त झालेली ती… पण उपचारांचा खर्च परवडण्याइतका तिच्या हातात नव्हता त्यातच आगी मुळे काहीच उरले नव्हते.
अशा वेळेस तिच्यासाठी आशेचा किरण ठरले ते बागलाणचे आमदार दिलीप मंगळू बोरसे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदारांच्या लक्षात तिची प्रकृती आली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी पुढे पाठवले. सुरुवातीला सटाण्यातील संपर्क कार्यालयात बोलावून घेतले, मग खाजगी डॉक्टरांची भेट, घेत त्यानंतर कळवण उपजिल्हा रुग्णालय, आणि अखेर नाशिक येथील संदर्भ रुग्णालयात दाखल करून उपचारांची जबाबदारी स्वतःच्या कार्यकर्त्यांवर सोपवली.
याच दरम्यान तिची सर्व कागदपत्रे आगीत भस्मसात झाल्याचे समजताच, आमदार बोरसे यांनी तहसीलदारांना तातडीची सूचना देऊन फक्त दोन दिवसांत आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र आणि इतर सर्व कागदपत्रे नव्याने मिळवून दिली – ही बाब खऱ्या अर्थाने प्रशासन आणि सामाजिक जबाबदारी यांच उत्तम उदाहरण ठरली. यांनातर नाशिकमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉ सुलभ भामरे व त्यांच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीम ने तिच्या पोटातून तब्बल १८ किलो वजनाची गाठ बाहेर काढली. आज त्या महिलेची प्रकृती स्थिर असून, ती हळूहळू बरी होत आहे.
या सर्व प्रक्रियेदरम्यान आमदार बोरसे यांनी आज स्वतः नाशिकच्या रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली. तिच्या आणि पतीच्या डोळ्यात अश्रू होते – ते केवळ दुःखाचे नव्हे, तर कृतज्ञतेचे होते. “आमदारसाहेबांच्या रूपाने देव भेटला,” असं म्हणताना त्यांच्या डोळ्यांतून झरत असलेले अश्रू साऱ्या घटनांचे साक्षीदार ठरत होते. आमदार बोरसे यांचे हे दातृत्व यापूर्वीही अनेक गरजूंना जीवनदान देणारे ठरले आहे. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल आता सर्वत्र घेतली जात असून, एक लोकप्रतिनिधी केवळ राजकारणी नसून समाजासाठी खंबीर आधार कसा असतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.