सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बागलाण विधानसभा निवडणुकीत यावेळी प्रचंड चुरस दिसत असून पारंपरिक विरोधकांमध्ये काटे की टक्कर होणार आहे. निवडणुकीच्या अंतिम नामांकनानंतर चित्र स्पष्ट झाले असून, विद्यमान आमदार दिलीप बोरसे (भाजप) आणि माजी आमदार दिपीका चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट) यांच्यात तीव्र लढत होण्याची शक्यता आहे. तसेच, प्रहार पक्षाच्या जयश्री गरुड या प्रथमच आमदारकीसाठी निवडणूक लढवत असल्यामुळे, मतदारांचे लक्ष त्यांच्या कडे आहे.
यावेळी बागलाणमध्ये एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपमधील बंडखोरी ऐनवेळी थांबवल्यामुळे दिलीप बोरसे यांच्या मार्गातील पक्षांतर्गत अडथळे दूर झाले आहेत. बोरसे यांनी ‘जनसंवाद यात्रा’ द्वारे जनतेशी संपर्क वाढवला आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचाराचा जोर कायम ठेवला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून दिपीका चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी परिवर्तनाचे आश्वासन देत तालुका पिंजून काढण्यास सुरवात केली आहे.
प्रहार पक्षाच्या जयश्री गरुड यांनीही सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवून समर्थकांची फळी उभी केली आहे. त्यांच्या प्रचाराला सामान्य मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप बोरसे यांना भाजपचा पाठिंबा लाभला असला तरी तालुक्यात चव्हाण कुटुंबियांच्या समर्थकांचेही भक्कम अस्तित्व असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. यंदा बागलाण मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहते की विद्यमान आमदार बोरसे यांना पुन्हा संधी मिळते, हे येणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होईल.