सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील आरम नदी शेजारील गावठाणात नर जातीचा बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्वरित वन विभागाला याची माहिती देण्यात आली. वन कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सदर बिबट्या सुमारे १० ते १२ दिवसांपूर्वी मृत पावलेला असावा. मृतदेह प्रचंड कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनास्थळी तपासणी केल्यानंतर वन विभागाने मृत बिबट्याला दोद्धेश्वर येथील वनविभागाच्या नर्सरीत नेले. तेथे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नियमानुसार बिबट्याचे दहन करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई डांगसौंदाणे वन परिमंडळाचे वनरक्षक किशोर मोहिते, नवनाथ मोरे तसेच इतर कर्मचारी आणि तालुका वन परीक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान, बिबट्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून, त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मात्र वन विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून मृत्यू हा नैसर्गिक कारणामुळेच झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.