निलेश गौतम, सटाणा
बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मद्यधुंद वैद्यकीय अधिकारीवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी आंदोलनाच्या इशारा दिल्यानंतर आज आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. संबंधित वैद्यकीय अधिकारीची खातेअंतर्गत चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटी दरम्यान उपस्थित गावकऱ्यांना सांगितले आहे.
दरम्यान काल झालेल्या गंभीर प्रकाराची दखल लोकप्रतिनिधी तसेच राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आज कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राला बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दिपीका चव्हाण यांनी भेट देत संबंधित कुटुंबप्रमुख व गावकऱ्यांशी सवांद साधत झालेला प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. संबंधित वैद्यकीय अधिकारीवर कारवाईसाठी आपण वरिष्ठांशी बोलणार असल्याचे सांगितले. या वेळी रुग्णालयच्या सर्वच विभागाची पाहणी चव्हाण यांनी केली. जे कर्मचारी स्थानिक राहत नसतील त्यांच्यावर ही कारवाई करण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल महाजन यांना चव्हाण यांनी दिल्या
काल झालेल्या घटनेनंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन व कार्यालयीन अधिकारी कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात तळ ठोकून आहेत. आज या आरोग्य केंद्रात मानविकासचा कॅम्प घेण्यात आला .दुपारनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांनी भेट देत सर्वच विभागाची झाडाझडती घेतली. आदिवासी भाग असल्याने आरोग्य सेवेत कुचराई करणाऱ्या कर्मचारी वर्गावर कार्यवाही करण्यात येईल ग्रामस्थांना रुग्ण सेवेत अडथळा वाटला तर थेट संपर्क करण्याचे आवहान डॉ. मोरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.
या पुढे या आरोग्य केंद्रात रुग्ण सेवे बद्दल तक्रारी होणार नाहीत याची प्रशासन काळजी घेणार असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.
संबंधित वैद्यकीय अधिकारी या रुग्णालयात येणार नाही व त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे हे मध्ये प्रदेश मधील बैतुल जिल्ह्यात पक्षीय दौऱ्यावर असल्याने त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना दूरध्वनी द्वारे संपर्क करीत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले.
महिला आयोगाने गंभीर दखल घेतली
सरकार गरोदर मातांसाठी लाखो रुपये आरोग्य यंत्रणेवर खर्च करत असताना एका जबाबदार वैद्यकीय अधिकारीने असे बेजबाबदार पणे वागणे गैर आहे संबंधित महिलेला झालेला त्रास हा गंभीर आहे. या बाबत महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
दिपीका चव्हाण माजी आमदार
सदस्या राज्य महिला आयोग
झालेला प्रकार दुर्दैवी
कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेला प्रकार दुर्दैवी आहे. माझ्या मतदार संघात असा गैरप्रकार कधी ही खपवून घेतला जाणार नाही. मध्य प्रदेश दौऱ्याहून आल्यानंतर मतदार संघातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात येणार आहे
आमदार दिलीप बोरसे