चमोली (उत्तराखंड) – प्रसिद्ध बद्रिनाथ मंदिर परिसरात काही मुस्लिम व्यक्तींनी कथितरित्या नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बद्रिनाथ मंदिर परिसरात अनेक मुस्लिम नमाज अदा करत असल्याचे सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोस्ट पाहताच स्थानिक पोलिसांच्या पथकाने संबंधित व्यक्तींचा तपास सुरू केला आहे. मात्र, अशी कोणतीच घटना झाली नसल्याची माहिती प्रारंभिक तपासात समोर आली आहे.
पोलिस अधीक्षक यशवंत सिंह चौहान यांनी सांगितले की, १५ मुस्लिम मजूर हरिंदर सिंह नावाच्या एका ठेकादाराच्या हाताखाली काम करतात. हे सगळे मजूर मंदिरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या एका पार्किंगच्या प्रकल्पाचे काम करत होते. प्रकल्पाचे मोठे साहित्य त्याठिकाणीच असल्याने ते साइटवरच राहात होते. ईद-उल-अजहा निमित्त त्यांनी तिथेच सकाळी सात वाजता नमाज अदा केला होता. त्यांनी कोणत्याही सार्वजनिक स्थळी नमाज अदा केला नाही. तसेच कोणत्याही मौलानांना बाहेरून बोलावले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नगरपालिकेचे माजी अध्यक्ष ऋषी प्रकाश सती आणि त्यांच्या सहकार्यांच्या तक्रारीवरून ठेकेदार आणि मजुरांविरुद्ध गर्दी व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यावरून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मंदिर परिसरात नमाज अदा केल्याच्या आरोपांचा तपास पोलिस करत आहे. तपासाच्या आधारावरच या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, मंदिराचे सर्व पुरोहित संतप्त झाले असून याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.