नवी दिल्ली – भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याने हुएल्वा येथे झालेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताच्याच लक्ष्य सेन याचा पराभव करून पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. श्रीकांतने अतितटीच्या सामन्यात सेन याचा १७-२१, २१-१४, २१-१७ असा पराभव केला.
किदांबी श्रीकांतला सेनने पहिल्या गेममध्ये अगदी सहज मात दिली. परंतु अनुभवाचा फायदा घेतल श्रीकांतने दुसर्या गेममध्ये सेनला मागे टाकत सामन्यात बरोबरी साधली. निर्याणक गेममध्ये दोघांनीही एकमेकांसमोर कठीण आव्हान दिले. एक वेळ सेनने सामन्यावर पकड मिळवली होती. परंतु श्रीकांतने सामन्यात पुनरागमन करण्यास जास्त वेळ लावला नाही. सलग अंक वाढवून त्याने तिसरा गेम आपल्या नावावर केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला.
रविवारी होणार्या अंतिम सामन्यात श्रीकांतने विजय मिळवला तर सुवर्णपदक मिळवणारा तो महिला एकेरी खेळाडू पी. व्ही. सिंधूनंतर दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर श्रीकांतने कमीत कमी रौप्यपदक आपल्या नावावर केले आहे. यापूर्वी १९८३ मध्ये प्रकाश पदुकोण यांनी आणि २०१९ मध्ये बी. साई प्रणीतने पुरुष एकेरीत कांस्य पदक आपल्या नावावर केले होते. २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत श्रीकांतने पुरुष एकेरीत रौप्यपदक पटकावले होते. तसेच २०१६ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते.