मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून आत्महत्या केली. या घटनेत एक पोलीस अधिकारी सुध्दा जखमी झाले आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली आहे.
ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॅाल्वर नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॅाल्वर हिसकावून त्याने तीन गोळ्या स्वत.वर झाडून घेतल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. १७ ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता.
SIT गठित करण्यात आली होती
बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले आहे. त्यानंतर सरकारने या प्रकरणात SIT गठित करण्याचे आदेश दिले होते. पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्यात आली होती. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले होते.
दोन मुलींवर अत्याचार
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर आता बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी रेल रोको, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे.