मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी त्यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा दिले आहेत.
दोन मुलींवर अत्याचार
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर आता बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी रेल रोको, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे.