मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या ….
दोन मुलींवर अत्याचार
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर आता बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी रेल रोको, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे.