मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले आहे. त्यानंतर सरकारने या प्रकरणात SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.
दोन मुलींवर अत्याचार
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर आता बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी रेल रोको, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली गंभीर दखल
बदलापूर मधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली आहे. अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही दिले.