नवी दिल्ली – एखाद्या बाळाचा जन्म उडणाऱ्या एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानात झाला असेल, तर त्या बाळाचे जन्मस्थळ आणि त्याचे नागरिकत्व कोणत्या देशाचे असेल? सर्वप्रथम तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे की सात महिन्यांवरील गरोदर महिलांना भारतात हवाई प्रवासावर बंदी आहे. काही विशेष परिस्थितीतच त्या हवाई प्रवास करू शकतात. पण, समजा एखादे अपत्य विमानात जन्मात आलेच तर त्याच्या नागरिकत्वाचे काय, हा प्रश्न आहेच.
आता समजा अशाच एखाद्या महिलेने भारतातून ब्रिटेनला जाणार्या विमानात बाळाला जन्म दिला, तर त्या बाळाचे जन्मस्थळ आणि नागरिकत्व कोणत्या देशाचे असेल, हा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे. अशा प्रकरणांमध्ये बाळाचा जन्म होताना विमान कोणत्या देशाच्या सीमेवरून उडत आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ज्या देशात विमान उतरेल त्या देशाच्या विमानतळ प्रशासनाकडून जन्म प्रमाणपत्र घेतले जाऊ शकते. त्याशिवाय आई-वडील ज्या देशाचे आहेत त्या देशाचे नागरिकत्व मिळण्याचा अधिकार बाळाला मिळतो.
भारतातील कायदा काय सांगतो
उदाहरणार्थ, जर बांगलादेशमधून अमेरिकेला जाणारे विमान भारतीय हद्दीतून गेले आणि त्याचदरम्यान एखाद्या महिलेने बाळाला जन्म दिला, तर बाळाचे जन्मस्थळ भारत मानले जाईल. ते बाळ भारताचे नागरिकत्व घेऊ शकते. पालकांच्या देशाचे किंवा भारताचे असे दोन्ही देशांचे नागरिकत्व मिळू शकते. परंतु भारतात दोन देशांच्या नागरिकत्वावर बंदी आहे.
हे प्रकरण आले समोर
अमेरिकेत असेच एक प्रकरण समोर आले. एक विमान नेदरलँडची राजधानी एम्सटर्डम येथून अमेरिकेत जात होते. त्याचदरम्यान एका महिलेने मुलीला जन्म दिला. तेव्हा विमान अटलांटिक महासागरावरून जात होते. विमान उतरल्यानंतर आई आणि मुलीला अमेरिकेच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेने अमेरिकेच्या हद्दीत मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे मुलीला नेदरलँड आणि अमेरिका अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व मिळाले. परंतु विमान उड्डाण करताना होणार्या बाळांच्या नागरिकत्वाबद्दलचे सर्व देशांचे नियम वेगवेगळे आहेत.