कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का लागला आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि माजी भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी (१८ सप्टेंबर) तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेर बॅनर्जी यांनी सुप्रियो यांचे टीएमसीमध्ये स्वागत केले. या वेळी खासदार डेरेक ओब्रायन उपस्थित होते. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी भाजपला रामराम केला होता.
राजकारण सोडण्याबाबत फेसबुकवर घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर दुसर्या दिवशी सुप्रियो म्हणाले, की त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. परंतु पुढे काय निर्णय घेतला याबाबत काहीच वक्तव्य केले नाही. आसनसोलचे खासदार सुप्रियो यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भविष्यात काय करणार हे काळच ठरवेल असे सांगितले. मंत्रिपदावरून डच्चू मिळाल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील भाजप नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. बाबुल सुप्रियो हे आसनसोल लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अरुप बिस्वास यांच्याविरुद्ध निवडणूक लढली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.