मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजता तीन जणांनी गोळया झाडून हत्या केली. गोळीबार केल्यानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबार प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. यातील एक आरोपी हरियाणा व दुसरा उत्तरप्रदेशचा असल्याची माहिती समोर आली.
बाबा सिद्दिकी यांच्यावर वांद्रे पूर्व येथील कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ गोळीबार करण्यात आला. येथील निर्मल नगर भागात फटाके वाजत असतांना त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. या तिन्ही आरोपींनी दोन ते तीन राऊंड फायर झाले. यातील एक गोळी ही त्यांच्या छातीला लागली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबाराचे वृत्त समजताच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी हे रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर अभिनेता संजय दत्त ही लिलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक नेतेही लिलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांना १५ दिवसापूर्वीच धमकीही आल्याचे बोलले जात आहे.
बाबा सिद्दिकी हे १५ वर्ष वांद्रे पश्चिमधून आमदार होते. त्यामुळे अनेक बॅालिवूड कलाकारांसोबत त्यांचे जवळचे संबध होते. सलमान खान पासून संजय दत्त पर्यंत अनेक त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत होते. दरवर्षी रमझान महिन्यात इप्तार पार्टीचे आयोजन करायचे या पार्टीला सेलिब्रिटी हजेरी लावायचे.
हल्लेखोरांवर कडक कारवाई करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे सांगत त्यांनी निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.