इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – योगगुरू बाबा रामदेव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या पतंजली कंपनीचे उत्पादन असलेल्या दिव्य दंत मंजनमध्ये कटलफिशची हाडं आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी पतंजलीला नोटीस पाठविण्यात आली आहे.
दिल्लीत वकील म्हणून कार्यरत असलेल्या वकील शाशा जैन पतंजलीला नोटीस धाडली आहे. शाशा जैन यांनी आपल्या नोटीससह सगळे दस्तावेजही जोडले आहेत. या दस्तावेजात त्यांनी हे स्पष्टपणे म्हटले आहे की दिव्य दंतमंजन शाकाहारी आहे, असे म्हटले गेले आहे. त्यावर हिरव्या रंगाची निशाणीही लावली आहे. मात्र दिव्य दंत मंजन यामध्ये समुद्र फेन वापरण्यात आले आहे. ग्राहकांसह केलेला हा धोका आहे. ग्राहकांची ही शुद्ध फसवणूक आहे.
लेबलिंग नियमांचे पतंजलीने उल्लंघन केले आहे असंही या नोटीसमध्ये म्हटले आहे. शाशा जैन यांनी असेही म्हटले आहे की, माझ्या कुटुंबातले काही सदस्य, काही परिचयाचे लोक दिव्य दंत मंजन वापरतात. मात्र, या दंत मंजनमध्ये कटलफिशसारखे मांसाहारी घटक वापरले आहेत. हे समजल्यानंतर त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. पतंजलीकडून याबाबत स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता उत्पादनांवर विश्वास कसा ठेवायचा असेही त्यांनी विचारले आहे.
पंधरा दिवसांत द्यावे उत्तर
शाशा जैन यांनी पतंजलीला जी नोटीस बजावली असून त्यामध्ये पुढच्या १५ दिवसांमध्ये उत्तर द्यावे असेही म्हटले आहे. तसेच उत्तर दिले नाही किंवा योग्य स्पष्टीकरण दिले नाही तर आम्ही कायेदशीर कारवाई करू असाही इशारा देण्यात आला आहे.