इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – योगाचे धडे देत संपूर्ण जगाला योगसाधनेकडे वळविणाऱ्या बाबा रामदेव यांनी आता संन्यासी होण्याचा नवीन अभ्यासक्रमच सुरू केला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहे. पतंजली संन्यास आश्रमतर्फे हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.
योगसाधनेच्या घराघरात पोहचलेल्या बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रॅण्ड आता नवीन राहिलेला नाही. बाबांच्या लोकप्रियतेचा फायदा पतंजलीला मिळाला आहे. रामदेव यांच्यावरील विश्वसनीयतेमुळे पतंजलीच्या विविध उत्पादनांना चांगली मागणी आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये पतजंलीचे मोठे शोरूम आणि प्रॉडक्ट स्टोअर आहेत. ज्या माध्यमातून आज सौंदर्यप्रसाधनापासून ते किराण्यापर्यंत आणि पूजेच्या सामग्रीपासून अयुर्वेदिक औषधांपर्यंत सारे काही उपलब्ध होत आहे.
दरम्यान, आता रामदेव यांनी संन्यासी घडविणारा नवीन अभ्यासक्रम आणला आहे. या अभ्यासक्रमाची जाहिरात देण्यात आली असून ती सध्या बरीच चर्चेत आहे. ज्यांनी कुणी संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आहे किंवा ज्यांची कुणाची इच्छा असेल, त्यांना प्रशिक्षित केले जाईल, असे या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पण यासाठी शिक्षणाची अट मात्र घालण्यात आली आहे. कोणताही इच्छुक उमेदवार किमान १२वी पास असायला हवा, असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. येत्या २२ मार्चपासून ३० मार्चपर्यंत पतंजलीकडून संन्यास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये या सर्व इच्छुकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. ३० मार्चला महोत्सवाच्या शेवटी यातल्या १०० लोकांना संन्यास दीक्षा दिली जाईल. अर्थात, हे सर्व ‘संन्यासी’ म्हणून घोषित होणार आहेत.
इतर शिक्षण घेता येणार
संन्यासी म्हणून दीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्शनशास्त्र, व्याकरण, वेदशास्त्र आणि संस्कृत साहित्य, बीए-एमए अशा विविध प्रकारचे शिक्षणही घेता येऊ शकणार आहे. २०१८मध्येही रामदेव बाबांनी ९२ पुरुष आणि महिलांना दीक्षा देऊन संन्यासी घोषित केले होते, हे येथे उल्लेखनीय.
Baba Ramdev Patanjali New Course Sanyasi Sanyas