हरिद्वार – येथील पतंजली योगपीठातील प्रकल्पात कर्मचारी आणि योगाचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या वृत्ताचे योगगुरू बाबा रामदेव यांनी खंडन केले आहे. आरोग्य विभागानुसार येथे ७० आणि सोशल मीडियानुसार ८३ जणांना संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. परंतु दोन्ही आकडे निराधार असून, येथे कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. दरम्यान, ७० जणांना बाधा झालेल्या पतंजली योगपीठाला दुसर्या टप्प्यातील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य आरोग्याधिकारी डॉ. एस. के. झा यांनी दिली आहे.
पतंजलीमधील विविध प्रकल्पातील कर्मचारी आणि योगाचार्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या सोशल मीडियावरील बातमीत कोणतेही तथ्य नाही. पतंजली, योगग्राम आणि आचार्यकुलममध्ये कोणीही बाधित झालेला नाही, असे बाबा रामदेव आणि पतंजलीचे प्रवक्ता एस. के. तिजारेवाला यांनी स्पष्ट केले. आचार्यकुलम येथे दरवर्षी २०० ते २५० विद्यार्थी प्रवेश घेतात असे सांगितले जात आहे.
कोरोना चाचणी अनिवार्य
त्याशिवाय पतंजली योगपीठात दररोज सरासरी ५० आणि योगग्राममध्ये ५० ते १०० रुग्ण उपचारासाठी येतात. सर्वांसाठी कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आचार्यकुलममध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. निगेटिव्ह अहवाल आल्यावरच प्रवेश दिला जात आहे. काहींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना परत पाठविण्यात आले आहे.
सोशल मिडियात जोरदार चर्चा
कोरोनिल या औषधाद्वारे कोट्यवधी रुपये कमावणारा पतंजली उद्योग कोरोनामुळे कसा प्रभावित झाला, असा प्रश्न सोशल मिडियात विचारला जात आहे. पतंजलीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना कसा झाला, त्यांना कोरोनिल दिले नाही का, की कोरोनिल विश्वासार्ह नाही, अशी टीकाही सोशल मिडियात केली जात आहे.
आखाड्यांमध्ये कोरोना रुग्ण
वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये आतापर्यंत १६८ कोरोनारुग्ण आढळले आहेत. दररोज सरासरी आठ ते दहा रुग्ण आढळत आहेत. जुना, निरंजनी आणि श्री शंभू पंचायती अटल आखाड्यामध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. मुख्य शाहीस्नान झाल्यानंतर आखाड्यांमध्ये कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ११ ते २२ एप्रिलपर्यंत आतापर्यंत १०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापूर्वीसुद्धा आखाड्यांमध्ये कोरोनारुग्ण आढळलेले आहेत.
३१५ विद्यार्थ्यांना बाधा
रुरकी येथील भारतीय औद्योगिक संस्थेत (आयआयटी) आतापर्यंत ३१५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच रुडकी येथीलच राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेत आतापर्यंत ३१ पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधितांमध्ये शास्त्रज्ञ, स्टाफ आणि कुटुंबीयांचा समावेश आहे. गुरुवारी संस्थेमधील एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. बीएचईएल क्षेत्रात गेल्या आठवड्यात २०० रुग्ण आढळले आहेत.