विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावरील अॅलोपॅथी उपचारावर आक्षेप घेतल्यानंतर देशभर वादळ उठले. रामदेव यांच्याविरोधात त्यांचेच लोक जाऊ लागले. फेडरेशन आफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननेही (एफएआयएमए) त्यांना नोटीस पाठवली. त्यावर आपले विधान मागे घेत रामदेव यांनी वातावरण शांत केले. आता दहा दिवसांनंतर रामदेव यांनी पलटवार करीत एफएआयएमएच्या नोटीशीत दम नसल्याचे विधान केले आहे.
अॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेदिक हा संघर्ष जुना आहे. त्यात रामदेव बाबांनी कोरोनाच्या निमित्ताने उडी घेतली. आयुर्वेदाचे समर्थन करणाऱ्या केंद्र सरकारशी त्यांचे नातेही घनिष्ट आहे. मात्र, यावेळी त्यांना केंद्र सरकारकडूनच दणका बसला. केंद्रात आरोग्यमंत्री असलेले डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना विधान परत घेण्याचे आवाहन केले. तसेच अशा प्रकारची विधाने करून अॅलोपॅथीचा अपमान करू नका, असेही सुनावले. त्यामुळे योगगुरू शांत झाले. मात्र आता त्यांनी एफएआयएमएला लक्ष्य केले आहे.
‘आयएमएकडे अर्धवट माहिती आणि एक तासाच्या लांबलचक बैठकीतील एका छोट्याशा टप्प्यावर आधारित व्हिडीओ आहे. वाद निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले वाक्य जगापुढे आणले गेले. मी केवळ प्रयोगात्मक उपचाराच्या अत्यधिक वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते,’ असे रामदेव यांनी म्हटले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही प्रायोगिक उपचाराचा अतिरेकी वापर योग्य नसल्याचे मत यापूर्वी व्यक्त केले आहे. पण याचा अर्थ कुठल्याही उपचार पद्धतीचा अपमान करणे हा माझा हेतू कधीच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
फेडरेशन आफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने पाठविलेल्या नोटीशीला उत्तर देताना रामदेव म्हणतात, ‘आपण पाठविलेली नोटीस पूर्णपणे चुकीची आहे. त्यात काहीही तथ्य नाही. केवळ अर्धवट माहितीच्या आधारावर हा नोटीस पाठविण्यात आली. त्यामुळे नोटीस परत घ्यावी, असे माझे आवाहन आहे.’