ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांसंबंधी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात देखील एक वेगळेच विधान केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. माझ्या नजरेने पाहिलं तर, महिलांना काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे विधान त्यांनी केले आहे. ठाणे येथील योगा कार्यक्रमामध्ये बोलताना रामदेव बाबा यांची जीभ घसरली. या कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस परिधान होते. त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावेळी रामदेव बाबा म्हणाले, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिले, तर काही नाही घातले, तरी चांगल्या दिसतात, असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे.
विशेष म्हणजे या योगा कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. त्यामुळे रामदेव बाबा यांच्या या विधानामुळे आणखी वाद होण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट व्यक्तिमत्त्व आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे ऊर्जावान व्यक्ती आहे, शिंदे-फडणवीस एकात्म भावनेने नवनिर्माण करत आहेत. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे, पुढेही ते रचणार आहेत. मी जेव्हा झोपेतून उठतो, तेव्हाही एकनाथ शिंदे यांना झोपायला वेळ मिळत नाही, एवढा पुरुषार्थ आहे त्यांच्यात, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा, असेही रामदेव बाबा म्हणाले. तसेच शिंदे हे आमच्या हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मासोबतच सनातन धर्म, ऋषी धर्माला प्रामाणिकपणे ते निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी मी भेट घेतली. कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत आमचे आत्मीय प्रेम होते. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत, अशी प्रतिक्रिया रामदेव बाबा यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर व्यक्त केली होती.
अमृता फडणवीस या १०० वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत
अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, की त्या १०० वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, असे योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. कारण त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावे तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलत होते.
अशी स्तुतीसुमने योगगुरू बाबा रामदेव यांनी उधळली असून बाबा रामदेव यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले.
तसेच, जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर असतो, तसाच आनंद मला उपस्थित महिला यांच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर सारवासारव केली. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो, मात्र त्यांचे मराठी भाषेवर प्रेम आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, कुठे ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा? महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. आज रामदेव बाबांनी स्त्रियांचा अपमान करून या परंपरेला तडा दिला आहे, असेही ते म्हणाले.
Baba Ramdev Controversial Statement on Women