इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – योगगुरू बाबा रामदेव यांच्या योगाभ्यासाने नव्हे तर त्यांनी चालविलेल्या महागड्या कारने सध्या अनेकांची झोप उडविली आहे. योगासानाला जागतिक स्तरावर सन्मान मिळवून देणाऱ्या रामदेव यांची कार सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बाबांनी ड्राइव्ह केलेल्या त्या कारची किंमत १ कोटींहून अधिक असल्याची माहिती आहे.
भारतीय योगशास्त्राला लोकप्रिय करून बाबा रामदेव यांनी योगाभ्यास खऱ्या अर्थाने घरोघरी पोहचविला. त्यांचा अनुयायी वर्ग देशविदेशात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रामदेव यांच्यामुळे योगासनांची महती पोहचली आहे. अशात त्यांचा पतंजली उद्योग, त्यांच्याकडील कोट्यवधींची संपत्ती कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. त्यांच्या संपत्तीबाबत यापूर्वीदेखील अनेकांनी आक्षेप नोंदविला असून काहींनी बाबांच्या आर्थिक चमत्कारापुढे होत जोडले आहेत. त्यात आता बाबांनी चालविलेल्या नवीन कारने धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यात ते नवी ‘लँड रोव्हर डिफेन्डर १३०’ कार चलवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील हरिद्वारचा असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. या व्हिडिओत, बाबा रामदेव कार चालविण्यापूर्वी तिची पाहणी करत आहेत. मात्र, ही कार बाबा रामदेव यांनी खरेदी केली आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीने ही कार फेब्रुवारी २०२३ मध्ये भारतात लॉन्च केली असून तिची डिलिव्हरी नुकतीच सुरू झाली आहे.
१.३० कोटींची कार
योगगुरू बाबा रामदेव चालवत असलेल्या लँड रोव्हर डिफेन्डर १३० या कारची किंमत कोटीच्या घरात आहे. हिची एक्स-शोरूम प्राइस १.३० कोटी ते १.४१ कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच एक महिंद्रा एक्सयूव्ही खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे.