नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिली माहिती
नाशिक : नाशिक परिक्षेत्रातील धुळे,जळगाव,नंदूरबार,अहमदनगर, नाशिक या पाच जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात केलेल्या कारवाईत ५१६५ किलो गांजा, ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर, ४८१ ग्रॅम चरस आणि वाहने असा तब्बल चार कोटी ६० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २२ गुन्हे दाखल करुन ३९ संशयितांना अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.
२४ सप्टेंबर रोजी शेखर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशिक परिक्षेत्रात अंमली पदार्थ, अवैध शस्त्र, गुटखा विक्री, अवैध मद्य अशा अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली त्यात ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईबाबत बोलतांना बी.जी.शेखर म्हणाले की, विशेष पथकांनी धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथे ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर तर चाळीसगाव रस्त्यावर ६२ किलो गांजा जप्त केला. नाशिक ग्रामीण पोलिसांनी रमजानपूरा भागात ४८१ ग्रॅम चरस वाहनासह जप्त केला. या तीन प्रकरणात १२ संशयीतांना अटक करून सुमारे १३ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जळगावच्या मुक्ताईनगर येथे व नंदुरबारमधील उपनगर येथील कारवाईत पाच जणांकडून ३३ लाख २४ हजारहून अधिक किंमतीचा गुटखा आणि वाहने जप्त करण्यात आली. धान्याचा काळाबाजार रोखण्यावर लक्ष दिले जात आहे. विशेष पथकांनी १३ लाख रुपये किंमतीचा दोन मालमोटारींसह रेशनिंगचा तांदूळ व गहू जप्त करत पाच जणांना अटक केली. नाशिकच्या देवळा व जळगावमधील धरणगाव तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. या शिवाय, पवार वाडी येथून ४३ लाखाचे बायो डिझेल, शिरपूर येथे नऊ लाखाची टेम्पोसह अवैध दारू, ८६ लाख रुपये किंमतीचे अवैध स्पिरीट, अवैध डांबर चोरी प्रकरणी ६३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष पथकांनी १६ ठिकाणी छापे टाकून ६३ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करीत दोन कोटी ६८ लाखहून अधिकचा मुद्देमाल जप्त केल्याचे शेखर यांनी सांगितले. २४ ऑगस्ट ते २८ ऑक्टोबर या कालावधीत परिक्षेत्रात पोलिसांच्या कारवाईत चार कोटी ६० लाख रुपये किंमतीचा गांजा, ब्राऊन शुगर, चरस, चार मोटारी, एक दुचाकी व भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. अवैध गुटखा प्रकरणी ३७ गुन्हे दाखल करीत ६४ संशयितांकडून सव्वा दोन कोटीहून अधिकचा पानमसाला व वाहने जप्त करण्यात आली आहेत.
हे केले जप्त
दोन महिन्यात परिक्षेत्रात वेगवेगळ्या कारवाईत एकूण ४० गावठी कट्टे, ८४ काडतुसे तसेच ६५ तलवारी जप्त करण्यात आल्या. तरुणाई अवैध पिस्तुल व कट्टे बाळगून गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष पथकांनी अलीकडेच वाडिव-हे, चोपडा शहर व ग्रामीण भागात केलेल्या कारवाईत सात संशयितांकडून आठ गावठी कट्टे,. २८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तपासात गावठी कट्ट्याचे धागेदोरे थेट उत्तरप्रदेश व बिहारसह मध्यप्रदेशात पोहोचले असून तेथून काही संशियतांना ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी ६२ जणांविरुध्द ६० गुन्हे दाखल करण्यात आले. यात ६५ तलवारीसोबत आठ लोखंडी कोयते, नऊ सुरे, प्रत्येकी एक सत्तुर, गुप्ती चॉपर व कात्रीचे पाते जप्त करण्यात आले.