सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण अचूक आणि प्रभावी उपचार कोरोना बाधितांना देऊ शकतो. दुर्देवाने त्याची फारशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे आज आपण प्रामुख्याने हेच जाणून घेणार आहोत की, आयुर्वेदामुळे आपण कोरोनावर नक्की मात करु शकतो.
सन २०२० या वर्षात ‘कोरोना’च्या साथीने संपूर्ण विश्वाला हादरवून सोडले. सगळं जग आज फक्त एका गोष्टीवर बोलतय, संपूर्ण विश्वात एकच आक्रोश आहे – “ कोवीड किंवा कोरोना संक्रमण “. संपूर्ण विश्व थांबलय, थकलयं, मार्ग शोधतयं, औषधे – उपाय शोधतयं, जीव वाचविण्यासाठीचे आटोकाट सर्वार्थाने प्रयत्न सुरु आहेत. जगभरातून येणार्या बातम्यांमुळे प्रत्येक माणूस आतून हलला आहे, विचलित झाला आहे. या परिस्थितीत काही निरीक्षणं समोर आली आहेत.
एकतर कोरोना व्याधीवर अजून तरी एकहुकमी औषध उपलब्ध नाही. दुसरे म्हणजे कोरोनामुळे एकीकडे काही जणांचा अल्पावधीतच मृत्यू होत असताना दुसरीकडे कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेले परंतु एकही लक्षण नसलेले जवळजवळ ७० ते ७५ टक्के रूग्ण आहेत. त्यांना काहीही त्रास नाही. अनेक डॉक्टर्स, नर्सेस, परिचारक, कोविड रूग्णांच्या सतत संपर्कात आहेत. काहींना कोरोनाची बाधा देखील झाली आहे परंतु कित्येकजण त्यापासुन बचावले देखील आहेत. पेपर मध्ये बातम्या आहेत की काही जास्त वयाची, एचअरसीटी जास्त असलेले, अनेक व्याधीनी पिडीत व्यक्ती, बेड न मिळुन सुध्दा, ऑक्सीजनशिवाय बरे होतायेत.
कोरोनाचेच उदाहरण द्यायचे झाले तर ज्या व्यक्तींचे वय जास्त आहे किंवा ज्या व्यक्तिंमध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, स्थौल्य, कृशता आहे ना कोरोनाचा संसर्ग होण्याचा जास्तीत जास्त धोका होता. परंतु काहींना यातील काहीही नसतांना ते रुग्ण दगावत आहेत. याचा अर्थ काय? तर प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती ही कमी-अधिक असते. त्यावर एखाद्या रोगाचे संक्रमण त्या व्यक्तीला होईल का? झाले तर ते किती तीव्र असेल हे ठरते.
कोणत्याही व्याधींपासून , आजारांपासून शरीराचे रक्षण करणारी किंवा रोग सहन करण्याची प्रत्येकाची एक नैसर्गिक ताकद असते, तिलाच प्रतिकार शक्ती किंवा आयुर्वेदात त्याला व्याधीक्षमत्व किंवा व्याधीसहत्व म्हणतात. थोडक्यात आजारांचा प्रतिकार करण्याची शरीराची असणारी नैसर्गिक ताकद ! आता प्रश्न पडेल कि प्रतिकार शक्ती जन्मजात असते कि ती नंतर वाढू शकते ?? आणि जर तिच्यात नंतर फरक पडत असेल तर कोणत्या कारणांनी ती कमी होते आणि वाढत असेल तर ती कशी वाढवायची ?? हे सर्व प्रश्न अगदी बरोबर आहेत. यांची उत्तरे अशी.
प्रतिकार शक्तीवर थोडया फार प्रमाणात आपल्या प्रकृतीवर, ऋतुवर अवलंबून असते. तसेच ती आहाराच्या, वागण्याच्या योग्य सवयींनी (Lifestyle Modification), पंचकर्म शुध्दिक्रिया, व्यायाम, योग, रसायन औषधी याद्वारे वाढवता येते व टिकविताही येते. या सर्व गोष्टी सातत्यपूर्ण पाळाव्या लागतात. त्याने मात्र निश्चित फरक पडतो व मिळणारा फायदा दीर्घकाल टिकतो. कोरोनाची लस कोरोना विरुद्ध क्षमत्व प्रदान करेल , परंतु भविष्यकालीन अन्य रोगजंतूंच्या संक्रमणापासून, आजारापासुन किंवा भविष्यात येणा-या करोनासारख्या जनपदोद्ध्वंसक व्याधीपासुन नाही मग परत काय ? म्हणूनच स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकार परिमोक्षः हे आयुर्वेदाचे ब्रीद अंगीकारावे लागेल.
खुप लोकांना आयुर्वेद म्हटलं की खुप पथ्य, कडु औषधे, काढे, कठीण पंचकर्म, उशीरा रिझल्ट असे वाटते परंतु प्रत्यक्षात असे नाही. जसे मोबाईल आल्यामुळे पुस्तक वाचनापासुन आपण दुरावलोय तसे ५००० वर्षाचा इतिहास असलेला आयुर्वेद आपल्यापासुन जवळ असुनही दुरावतोय, आपल्या कणाकणात रुजलेल्या आयुर्वेदाची जागा पाश्चात्य शास्त्राने घेतलीय त्यामुळे आपल्याला आयुर्वेद अवघड वाटतो.
काही नियमित कि.मी नंतर आपल्या वाहनाची सर्विसिंग करणे आपण अगत्याने पाळतो परंतु रोज झिजत असलेल्या आपल्या शरीराची सर्विसिंग पंचकर्म उपचारांद्वारा करतांना आपण खुप कारणे देतो. दिवाळीला घराचा कानाकोपरा स्वच्छ करण्याचा आग्रह धरतो परंतु प्रत्येक ऋतु बदलानुसार करावयाच्या शरीरशुद्धी कडे दुलर्क्ष करतो.
नियमित योग व मेडिटेशन द्वारे होणा-या मनशुध्दी कडे व मन सबलीकरणाकडे वेळेचे सोईस्कर कारण देवुन पाठ फिरवितो. हे मान्य आहे की कोणीही आपला व्यवसाय किंवा उपजीविकेचे मार्ग किंवा त्याच्या वेळेमध्ये तडजोड करु शकत नाही परंतु त्यासाठी आरोग्य पणाला लावणे हा त्याला पर्याय असु शकत नाही.
बदलत्या काळानुसार आयुर्वेदातील तत्वांना बाधा न आणता उपचार घेण्यासाठी पर्याय आहेत जसे कडु काढे यासाठी काढा आटवुन केलेली कषाय वटी किंवा गरम पाण्यात टाकुन लगेच काढा तयार असे पर्याय, कडु तुपांचे कँप्सुल फॉम्युलेशन, घरीच घेता येतील अशा पद्धतीचे बस्ती कीट इ.. जसे घरच्या घरी ऑपरेशन करता येत नाही त्यावेळी हॉस्पीटल मध्ये जावेच लागते त्याप्रमाणे वमनासारखे पंचकर्म उपचार व आपल्या आजारावरील योग्य औषध मात्र तज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच केलेले योग्य असतात.
स्वतः दिनचर्या किंवा जीवनशैली न पाळणारे लोक मात्र आपल्या पाळीव प्राण्यांचे सर्व रुटीन व्यवस्थित सांभाळतांना दिसतात मात्र स्वतःची वेळ आल्यावर कारणे शोधतात. आपण सर्व १०० टक्के नाही पाळु शकत म्हणुन शक्य असलेले ७० टक्के टाळतो. राहिला प्रश्न पथ्य पाळण्याचा तर पथ्य हे आजाराला अनुसरुन असते व आजार वाढु नये म्हणूनचे हेतु परिवर्जन असते. त्यामुळे पथ्य पाळणे म्हणजे सर्व चविष्ट गोष्टी बंद हा गैरसमज नसावा.
पुर्वीच्या काळी आजसारखे पिझ्झा, बर्गर, फॉस्ट फुड, बेकरी फुड, प्रिझवर्ड फुड खाण्याचा प्रघात नव्हता त्यामुळे साहजिकच आजार कमी व ओघाने पथ्य व औषधे कमी लागायची . वाढत्या प्रगतीकरणात हळुहळु आपण आपले मुळ नैसर्गिक भारतीय आहारशास्त्र मात्र विसरत गेलो आणि डायबेटिस, उच्च रक्तदाब, हायपोथॉयरॉयड, कँन्सर यासारखे आजार हळुहळु घर करायला लागले.
आजच्या कोरोना महामारीतही आम्ही सर्वानी आयुर्वेदाची ताकद अनुभवली आहे. आयुर्वेदीक औषधे(उदाः गुडुची, अश्वगंधा, तुळस,कापूर, सुंठ, मिरे, पिंपळी, दालचिनी, यष्टिमधु, निलगिरी) नस्य (नाकात औषधी तेल किंवा तुप टाकणे) गंडुष( औषधी काढा किंवा तेलाने गुळण्या), धुपन(औषधी धुप जाळणे), बाष्पस्वेदन( वाफ घेणे)पथ्यपालन, रसायन औषधे (महालक्ष्मीविलास, श्वास कास चिंतामणी, च्यवनप्राश, सहस्रपुटी अभक, श्वासकुठार, हेमगर्भ, सुवर्णभस्म अशी अनेक औषधे) व योग यांचा वापर करुन अनेक रुग्णांचा श्वासाचा त्रास कमी होतांना दिसतोय.
ऑक्सिजनची पातळी वाढतांना दिसतेय, व्हायरल लोड कमी होतोय, ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, पोटदुखी, जुलाब, उलट्या यासारखी लक्षणे लगेच आटोक्यात येत आहे. एवढेच नव्हे तर करोना होवुन गेल्यानंतरचे लंग फायब्रोसीस(LUNG FIBROSIS), फुफ्फुसांची ताकद कमी होणे, दम लागणे, पाश्चात्य औषधांचे साईड इफेक्ट सुध्दा कमी होण्यासाठी फायदा होतोय. योगातील भुजंगासन, सिंहमुद्रा, सेतुबंधासन, विपरीत नौकासन, वीरासन, त्रिकोणासन, उष्ट्रासन, धनुरासन, चक्रासन, कपालभाती, नेती इ क्रियांनी फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
सारी, स्वाईन फ्लु, करोना यासारखे नवनवीन आजार येतच राहणार आहेत व आपली जागा तयार करण्याचा प्रयत्न करणारच आहेत गरज आहे ती आपण लढण्यासाठी सक्षम होण्याची. घराघरात आयुर्वेद व योग जागरुकतेने रुजविण्याची.
(वरील औषधांचा उल्लेख उदाहरणादाखल केला असून कोणीही तज्ञ डॉक्टर च्या सल्ल्याशिवाय त्याचा परस्पर वापर करू नये.)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!