इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सॅनिटाझर, स्प्रे मशिन यासह अनेक बाबी शोधून काढण्यात आल्या आहेत. मात्र, चक्क धूपच कोरोनाला पळवू शकतो, असे तुम्हाला कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. पण, हे खरे आहे. एका संशोधनातून हे समोर आले आहे. हा धूप खरोखरच यशस्वी ठरला तर कोरोनावर विजय मिळविण्यात मोठी मजल मारता येणार आहे.
बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असा दावा केला आहे की, १९ आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून बनवलेले हर्बल धूप कोरोना विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळले आहे. हे धूप जाळल्याने कोरोना संसर्गाचा धोका तर कमी होतोच, पण घरात कोरोनाचा रुग्ण असल्यास इतरांना संसर्ग पसरण्याचा धोकाही टळतो. तसेच, अशा रुग्णाच्या फुफ्फुसात संसर्ग पोहोचत नाही.
हे संशोधन बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या वैद्यकशास्त्र विभागातील डॉ. केआरसी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एमिल फार्मास्युटिकलच्या सहकार्याने करण्यात आले आहे. आयसीएमआरच्या क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री (CTRI) कडून नोंदणी मिळाल्यानंतर, १९ औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या एअरवैद्य या आयुर्वेदिक धूपच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. हा अभ्यास दोन गटांवर करण्यात आला. पहिल्या गटात शंभर प्रौढ आणि दुसऱ्या गटात दीडशे प्रौढांचा समावेश करण्यात आला होता. एका गटाला सकाळी आणि संध्याकाळी दहा मिनिटे त्यांच्याजवळ धूप लावण्यात आले. तो धूर श्वासातून त्यांच्या शरीरात गेला. तर दुसऱ्या गटाजवळ हे धूप लावण्यात आले नाही. एका महिन्यानंतर जिथे धूप लावले नव्हते अशा ३७ टक्के लोकांमध्ये कोरोनासारखी लक्षणे दिसून आली. तर जिथे धूप लावले होते, त्या गटातील केवळ सहा लोकांमध्ये म्हणजे चार टक्के लोकांमध्ये कोरोना संसर्गासारखी लक्षणे आढळून आली. या लक्षणांमध्ये ताप, खोकला, सर्दी, चव कमी होणे, वास कमी होणे आदी लक्षणे दिसून आली.
डॉ. रेड्डी यांच्या मते या संशोधनाचे तीन मोठे परिणाम आहेत. हवाबंद धूप कोरोना संसर्ग किंवा इतर कोणत्याही विषाणू संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतो. दुसरे म्हणजे, यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होतो. कारण हे धूप हवेत असलेल्या कोरोना विषाणूला निष्क्रिय करतो. अशा परिस्थितीत घरात कोरोनाचा रुग्ण असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका शून्य होतो. तिसरा फायदा म्हणजे हे धूप या विषाणूला घशातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो. एमिल फार्मास्युटिकलचे कार्यकारी संचालक डॉ. संचित शर्मा यांनी माहिती दिली की, या धूपमध्ये राळ, कडुनिंब, ओवा, हळद, गवतीचहा, तुळस, पिवळी मोहरी, चंदन, उसीर, गुग्गल शुद्ध, नागरमोथा, मेंदी, नागर, लोबन धूप, कापूर अशा औषधी घटकांचा समावेश आहे.