इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या अनेक वर्षांपासून रामभक्त ज्या दिवसाची वाट बघत आहेत अखेर त्याची निश्चिती झाली आहे. अयोध्येतील राम मंदिराचे काम २०२३ मध्ये पूर्ण होईल. त्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन भक्तांना घेता येईल. यासंदर्भातील कृती आराखडा निश्चित झाला असून आता अतिशय वेगाने मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण केले जाणार आहे.
श्री रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिर निर्माण उद्दीष्ट साध्य करण्यासाठी बांधकामांची कालबद्ध कृती योजना बनविली आहे. रामनगरी अयोध्या येथील सर्किट हाऊस येथे झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत या योजनेचा ब्लू प्रिंट तयार करण्यात आली होती. या योजनेनुसार मंदिर बांधण्याचे काम २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल आणि संपूर्ण संकुलाचा विकास २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
अयोध्येत दोन दिवसांच्या बैठकीनंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली. राय म्हणाले की, राम मंदिरासह संपूर्ण ७० एकरचा हा परिसर पर्यावरणास अनुकूल ठरणार असून रामनगरी परिसरातील कचरा, ड्रेनेज आणि पाणी यांची अडचण होऊ नये म्हणून सीवर ट्रीटमेंट व वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स उभारले जातील. या परिसरामध्ये जास्तीत जास्त झाडे देखील संरक्षित केली जातील जेणेकरुन ऑक्सिजनची पातळी आणि तापमान योग्यप्रकारे टिकेल.
चंपत राय यांनी पुढे सांगितले की, येथे बांधकामात जोधपूरचे ग्रॅनाइट व मिर्झापूरच्या लाल बांधीव पहाडपूर दगडांचा वापर केला जाणार आहे. पावसाच्या पाण्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेने संरक्षित भिंत बनविली जाईल. वयोवृद्ध आणि दिव्यांग भाविकांच्या सोयीसाठी दोन लिफ्ट बसविण्यात येतील. बैठकीत उत्पादन प्रक्रियेत सिमेंटच्या कमीत कमी वापरावरही चर्चा करण्यात आली आणि सिमेंटऐवजी फ्लाय अॅश वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर वीटऐवजी दगडांचा अधिकाधिक वापर करण्यावरही बैठकीत सहमती दर्शविली गेली आहे.