इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी राम मंदिराचा एक नवीन थ्रीडी व्हिडिओ जारी केला आहे. ६ मिनिटे आणि २२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये राम मंदिराच्या बांधकामानंतर मंदिर किती सुरेख आणि भव्य दिसेल हे या व्हीडिओतून सादर करण्यात आले आहे. एकेकाळी अयोध्येत राममंदिर उभारणीची संकल्पना फार दूरची होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या ९ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या निर्णयानंतर रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीची प्रक्रिया प्रगतीपथावर सुरू आहे. आता थ्रीडी व्हिडिओच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होताना बघता येत आहे. गेल्या वर्षी १५ जानेवारीपासून सुरू झालेल्या बांधकाम प्रक्रियेअंतर्गत ४५ ते ५० फूट खोल पाया आणि त्यावर पाच फूट जाडीचा आणखी एक थर टाकण्यात आला असून २४ जानेवारीपासून मंदिराच्या २१ फूट उंचीच्या पायाचे बांधकाम सुरू झाले आहे.
https://twitter.com/ShriRamTeerth/status/1492857554841395212?s=20&t=4qSTxSO-VlItwWU4NOL6wA
अयोध्येतील रामजन्मभूमीचे मंदिर अतिशय भव्यदिव्य आहे. येथील संकुलात भव्य मंदिरासह सांस्कृतिक उपनगर बांधण्याचा प्रस्ताव आहे. हे मंदिर ३६० फूट लांब, २३५ फूट रुंद आणि १६१ फूट उंच आहे. मंदिरात आठ ते दहा फूट व्यासाचे आणि १४ ते १६ फूट उंचीचे चारशेहून अधिक खांब वापरण्यात येणार आहेत. १६१ फूट उंच मुख्य शिखराशिवाय चार उपशिखर असतील. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराची पायाभरणी केली. तेव्हापासून रामलल्लाच्या मंदिराचे मूर्त स्वरूप सुरू झाले आहे. २०२३मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, त्यानंतर दर्शनासह दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू राहणार आहे. मंदिराचे पूर्ण स्वरूप २०२५पर्यंत उभारले जाईल.