लखनऊ (उत्तर प्रदेश) – अयोध्येत राम मंदिराचे निर्माण करणार्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय आणि अंलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी रुपयांची जमीन १८ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. समाजवादी पार्टी सरकारमधील माजी मंत्री आणि अयोध्याचे माजी आमदार पवन पांडे यांनीसुद्धा चंपत राय यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
काही कागदपत्रे सादर करत संजय सिंह म्हणाले, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामाच्या नावावर कोणी भ्रष्टाचार आणि घोटाळा करण्याची हिम्मत कोणी करेल, याची कल्पनासुद्धा करवत नाही. रामजन्मभूमी ट्रस्टच्या नावावर चंपत राय यांनी कोट्यवधी रुपये चंपत केल्याचे ही कागदपत्रे ओरडून ओरडून सांगत आहेत.
खासदार सिंह यांनी दावा केला की, अयोध्या तालुक्यातील बाग बिजैसी गावात पाच कोटी ८० लाख रुपयांची गट क्रमांक २४३,२४४ आणि २४६ ही जमीन सुलतान अंसारी आणि रवी मोहन तिवारी नावाच्या व्यंक्तींनी कुसूम पाठक आणि हरिश पाठक यांच्याकडून १८ मार्चला दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती. सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी झालेल्या जमीन खरेदी व्यवहारात रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्येचे महापौर हृषीकेश उपाध्याय साक्षीदार झाले होते. त्यानंतर बरोबर पाच मिनिटांनंतर याच जमिनीला चंपत राय यांनी सुलतना अंसारी आणि रवी मोहन तिवारी यांच्याकडून १८ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. त्यामध्ये १७ कोटी रुपयांचे आरटीजीएसद्वारे व्यवहार करण्यात आला.
दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची किंमत जवळपास प्रति सेकंद साडेपाच लाख रुपयांनी वाढली. भारतातच नव्हे, तर जगभरात कुठेही कोणत्याही जमिनीचे भाव इतक्या वेगाने वाढले नाहीत. त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे, अनिल मिश्रा आणि हृषीकेश उपाध्याय हे दोघेही आधीच्या व्यवहारात साक्षीदार झाले होते. ते नंतर ट्रस्टच्या नावावर जमीन खरेदी करण्यातही साक्षीदार झाले. हे संपूर्णपणे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने याची तत्काळ सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करून या भ्रष्टाचारी लोकांना कारागृहात टाकावे. आपल्या मेहनीच्या मिळकतीतून राम मंदिरासाठी निधी दिलेल्या देशभरातील रामभक्तांच्या आस्थेचा आणि त्यांच्या विश्वासाचा प्रश्न आहे.
खासदार सिंह म्हणाले, या खरेदी व्यवहारातील कराराच्या मुद्रांकावरील वेळ आणि करारनामा मुद्रांकाच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ट्रस्टला नंतर जी जमीन विक्री करण्यात आली, त्याचा मुद्रांक सायंकाळी पाच वाजून ११ मिनिटांनी खरेदी करण्यात आला आणि जी जमीन आधी रवी मोहन तिवारी आणि असारी यांनी खरेदी केली तिचे मुद्रांक पाच वाचून २२ मिनिटांनी खरेदी करण्यात आला. कोणतीही जमीन खरेदी करण्यासाठी मंडळाकडून कायदेशीर प्रस्ताव येतो. फक्त पाच मिनिटांतच राम मंदिर ट्रस्टने हा प्रस्ताव कसा मंजूर केला? आणि लगेचच जमीन कशी खरेदी केली?
राय यांचा खुलासा
अशा आरोपांनी आपण घाबरत नाही. या आरोपांचा अभ्यास करणार आहे. माझ्यावर महात्मा गांधी यांची हत्या केल्याचा आरोपीही लावण्यात आला होता. आम्ही आरोपांना घाबरणार नाही. याचा संपूर्ण अभ्यास आणि चौकशी करणार आहे, असे स्पष्टीकरण चंपत राय यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले.