अयोध्या – अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या निर्माणाचे काम सुरू झाले आहे. मंदिर निर्माणासाठी देशभरातून अनेकांनी देणगी दिलेली आहे. परंतु बांधकामासाठी विश्व हिंदू परिषदेने देणगी दिलेले २२ कोटी रुपयांचे १५ हजार चेक बाउन्स झाले आहेत. राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या एका लेखापरीक्षण अहवालात ही बाब सांगण्यात आली आहे. खात्यांमध्ये कमी रक्कम असल्याने किंवा तांत्रिक त्रुटींमुळे चेक बाउन्स झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच संबंधितांना पुन्हा दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या चेकपैकी जवळपास दोन हजार चेक अयोध्येतून जमा झाले आहेत, अशी माहिती न्यासाचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले.
मकरसंक्रांतीनंतर विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी देशव्यापी निधी संकलन अभियान सुरू केले होते. १५ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबविण्यात आले होते. याद्वारे देशभरातून जवळपास ५ हजार कोटी रुपये जमा झाले होते. मात्र न्यासाने अद्याप अंतिम आकडेवारी जाहीर केलेली नाही. अयोध्येत एक हजार कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र देणगी म्हणून जमा झालेली रक्कम तीन हजार कोटींहून अधिक आहे, असे ट्रस्टच्या अधिकार्यांनी सांगितले.