अयोध्या – उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकालाचे हे अखेरचे वर्ष आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने पाचवा दीपोत्सव अविस्मरणीय करण्याची तयारी सुरू केली आहे. यंदा दीपोत्सवानिमित्त प्रथमच पाचशे ड्रोनच्या मदतीने एरिअल ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश पर्यटन मंत्रालयाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. याअंतर्गत १० ते १२ मिनिटांच्या हवाई शोच्या माध्यमातून आयोजनाला भव्यता देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये इंटेलतर्फे १८२४ ड्रोन हवेत सोडून या प्रकरारचे आयोजन करण्यात आले होते.
त्रेतायुगात भगवान राम यांच्या अयोध्येत परतण्याच्या कथेला अॅनिमेशन आणि स्टिम्युलेशनच्या माध्यमातून दाखविण्यासाठी ड्रोन शो करण्यात येणार आहे. पर्यटन विभागाच्या जाहिरातीच्या प्रस्तावात सांगण्यात आले आहे की, एजन्सीकडून नवे तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय निकषांसह शो दाखविण्याची आशा करण्यात आली आहे. यामध्ये ४०० मीटर उंचीपर्यंत १२ मीटर प्रतिसेकंद वेगाने उडणार्या एलईडी प्राप्त क्वाडप्टर्स किंवा मल्टिरॉटर्सचा वापर करण्यात येणार आहे. कमीत कमी अंतरात व्हिज्युअलची योग्य आणि प्रभावी मॉर्फिंग करण्यासाठी ड्रोनच्या वेगाची गणना होणार आहे. सोबतच त्यांची लँडिंग आणि टेक-ऑफसाठी परिसरात बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत.
इंटेलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, टोकियो ऑलिम्पिक्समध्ये अधिकृत ड्रोन सहकारी असलेल्या इंटेलने कोचेलापासून सुपर बॉलपर्यंत शानदार ड्रोन शो केले आहेत. त्यांच्याकडे इंजिनिअर्स, अॅनिमेटर्स आणि फ्लाइट क्रूचे एक पथक आहे. हे पथक शोला शानदार पद्धतीने तयार करतात. इंटेल पाचशे ड्रोन शोसाठी जवळपास तीन लाख डॉलर म्हणजेच २.२ कोटी रुपये घेते. एलिअर ड्रोन शोसह पूर्वीप्रमाणेच यंदाही राम की पौडी येथील भवनांवर थ्री-डी होलोग्राफिक शो, थ्री-डी प्रोजेक्शन मॅपिंग आणि लेझर शो असेल.
एरिअल ड्रोनसह कार्यक्रम एकूण ३५ मिनिटांचा असेल. त्यामध्ये आठ मिनिटे थ्री-डी होलोग्राफिक शो आणि दहा मिनिटांचा थ्री-डी प्रोजेक्शन मॅपिंग शो असेल. कार्यक्रमापूर्वी या सर्व आयोजनांचे परीक्षण केले जाईल. पर्यटन संचालनालयाचे संयुक्त संचालक अविनाश मिश्र यांनी ड्रोन शोच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, या कार्यक्रमासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुरुवारी या संदर्भात विभागाची बैठकही झाली आहे. अयोध्या संशोधन संस्था या उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाच्या स्वायत्त संस्थेच्या कार्यक्रमांतर्गत २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या रामायण कॉन्क्लेव्हचा समारोप दीपोत्सवानिमित्त अयोध्येत १ नोव्हेंबरला केले जाणार आहे.