इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तान भारताचा शत्रू असला तरीही त्या देशात प्रतिभावान क्रिकेटपटू घडतात, हे मान्य करण्यात कुठलाही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. पण अगदी बोटावर मोजण्याएवढी उदाहरणे सोडली तर पाकिस्तानात कुणीही खेळाडू निवृत्तीची वेळ येईपर्यंत क्रिकेट खेळलेला नाही. आता एका महिला क्रिकेटपटूने देखील असाच धाडसी निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानची आक्रमक फलंदाज आयेशा नसीम ही केवळ १८ वर्षांची असून तिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आत्ता कुठे सुरू झाली होती. अनेकांच्या वाट्याला एवढ्या कमी वयात देशासाठी खेळण्याची संधीदेखील येत नाही. मात्र आयेशा आतापर्यंत पाकिस्तानसाठी चार एकदिवसीय सामने आणि ३० टी-२० सामने खेळलेली आहे. मात्र यावर्षी फेब्रुवारीतच तिने आपण धर्मासाठी क्रिकेट सोडत असल्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानमधील तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.
यापूर्वी ऐन फार्मात असताना पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा ठोकलेला आहे. सईद अन्वर, इंझमाम-उल-हक्, मोहम्मद युसूफ, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद अशी काही नावे देखील सांगता येतील. अन्वरने तर मुलीच्या मृत्यूच्या दुःखात क्रिकेट सोडले होते. विशेष म्हणजे इंझमाम, युसुफ, मुश्ताक, सकलेन हे खेळाडू तर तबलिगी जमातीशी जुळलेले असतानाही क्रिकेटवर भाष्य करतात. आता आयेशा नसीमने धाडसी निर्णय घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वसीम अक्रमकडून कौतुक
पाकिस्तानचा माजी कर्णधार व वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने आयेशा नसीम हिचा प्रतिभावान खेळाडू म्हणून काही महिन्यांपूर्वी उल्लेख केला होता. त्यामुळे आयेशाकडून संपूर्ण देशाला अपेक्षा होता. पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने आयेशाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही.
इस्लामच्या सिद्धांतावर जगायचेय
इस्लामच्या सिद्धांतांवर आयुष्य जगण्यासाठी क्रिकेट सोडत असल्याचे आयेशाने जड अंतःकरणाने जाहीर केले होते. त्यावर मुस्लीम म्हणूनही तू खेळू शकतेस, असे तिच्या सहकाऱ्यांनी सूचविले होते. मात्र हा आपला वैय्यक्तिक निर्णय असल्याचे सांगत आयेशा निवृत्तीवर ठाम राहिली.