पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही महिन्यांपासून जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले हे वादात अडकले आहेत. रजा मंजूर करुन घेणं, रजेवर असतानाही वेतन मिळवणं असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. या सगळ्यामुळे त्यांच्याविरोधात प्रशासकीय कारवाई प्रलंबित असतानाही ते फुलब्राइट शिष्यवृत्तीअंतर्गत शैक्षणिक संशोधनासाठी ते अमेरिकेला रवाना झाले आहेत. त्यामुळे डिसलेंचा विषय पुन्हा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
लंडनमधील वार्की फाऊंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळविलेले डिसले हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक आहेत. त्यांना अमेरिकेतील फुलब्राइट शिष्यवृत्तीही जाहीर झाली असून या शिष्यवृत्तीअंतर्गत ते सहा महिने शैक्षणिक संशोधन करणार आहेत. यानुसार अमेरिकेत सुमारे सहा महिने शैक्षणिक संशोधन करण्यासाठी डिसले यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे १५३ दिवसांची प्रदीर्घ अध्ययन रजा मागितली होती. परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्रे न जोडल्यामुळे आणि विचारलेली कायदेशीर माहिती न दिल्यामुळे त्यांची अध्ययन रजा वादात सापडली होती.
तेव्हा तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी डिसले यांची अध्ययन रजा अगोदर मंजूर करावी आणि नंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे स्पष्ट आदेश देत या प्रकरणी हस्तक्षेप केला होता. या आदेशानंतर प्रशासनाने डिसले यांची १५३ दिवसांची प्रदीर्घ अध्ययन रजा मंजूर केली होती. परंतु त्यावेळी डिसले यांनी जि. प. शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून आपला छळ होत असल्याची तक्रार प्रसारमाध्यमांपुढे केली होती. नंतर त्यांनी आरोप मागे घेऊन प्रशासनाकडे दिलगिरी व्यक्त केली होती.
याबरोबरच, सलग ३४ महिने नियुक्ती केलेल्या कोणत्याही ठिकाणी सेवेत हजर न राहता स्वत: वेतन घेणे, ठिकठिकाणी सेवा बजावताना त्यांच्या स्वाक्षरीमध्ये फरक आढळून येणे, अशा विविध १२ मुद्दय़ांवर शिक्षण विभागाच्या समितीने डिसले यांची चौकशी केली होती. यात डिसले हे दोषी आढळून आल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष आहे. चौकशी समितीचा अहवाल प्रशासकीय कारवाईसाठी जिल्हा परिषद प्रशासन विभागाकडे प्रलंबित असताना गेल्या महिन्यात डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्रशासनाकडे पाठविला होता.
डिसलेंविरोधात सक्षम चौकशी समितीच्या अहवालात ठपका ठेवल्यामुळे त्यांच्यावरील प्रशासकीय कारवाई प्रलंबित राहिली आहे, परंतु ही चौकशी होण्यापूर्वीच मंजूर झालेल्या प्रदीर्घ अध्ययन रजेनुसार डिसले हे फुलब्राइट शिष्यवृत्तीअंतर्गत शैक्षणिक संशोधनासाठी मंगळवारी अमेरिकेकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी वादग्रस्त होण्याची शक्यता आहे.
Award Winning Teacher Ranjitsingh Disle USA Tour Controversy