दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले जयंतीदिनी अवनखेडच्या सावित्रीच्या लेकींना वाचनालयाच्या रूपाने शेकडो पुस्तकांची भेट मिळाल्याने त्या हरखून गेल्या. निमित्त होते ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्याच्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या शृंखलेत १७ व्या वाचनालयाचे उद्घटनाचे. दिव्य मराठीचे संपादक जयप्रकाश पवार, अभिजित कुलकर्णी, एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ. रविराज खैरनार आणि सरपंच नरेंद्र जाधव या मान्यवरांच्या हस्ते दिंडोरीच्या अवनखेड येथे हा सोहळा संपन्न झाला.
दोन वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले जयंती दिनीच सोशल नेटवर्किंग फोरमने ग्रामीण भागात वाचनालये सुरु करण्याची चळवळ सुरू केली होती. दुर्गम भागातील मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचत नाहीत म्हणून पुस्तकांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरु झाली होती. आनंदाची बाब ही कि दोन वर्षात एसएनएफने १७ गावांमध्ये वाचनालये सुरु करून हजारो मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचवली आहेत.
या मोहिमेंतर्गत अवनखेड येथील एसएनएफ वाचनालय कै. विमल शंकरराव खैरनार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविराज, संदीप खैरनार, सुनीता शिंदे, अनुष्का अशोक भट – न्यूझीलँड आणि सौ. विजया जीवन सोनवणे यांच्या सहकार्यातून उभे राहिले आहे. वाचनालयासाठीची वास्तू अवनखेड ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमप्रसंगी सावित्रीबाईंची प्रतिमा आणि पुस्तकं ठेवलेल्या ग्रंथदिंडीची मिरवणूक काढून गावकऱ्यांनी पुस्तकांचे स्वागत जल्लोषात केले. त्यानंतर मान्यवरांनी वाचनालयाचे उदघाटन केले. प्रमोद गायकवाड यांनी प्रास्ताविकात एसएनएफच्या वाचन संस्कृती चळवळीचा हेतू विषद केला. अभिजित कुलकर्णी, डॉ. रविराज खैरनार, सरपंच नरेंद्र जाधव, नागूजी गुरुजी गांगुर्डे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनी आराध्या कोंबडे, वैष्णवी पिंगळ, समृद्धी निकम यांनी भाषणे सादर केली.तालुका समन्वयक जयदीप गायकवाड यांनी सुत्रसंचलन केले तर ग्रामसेवक शंकर माळोदे यांनी आभार मानले.
या प्रसंगी डॉ. सौ. अर्चना खैरनार, माणिक सोनवणे, हिरामण सोनवणे, प्रशांत बच्छाव, डॉ. निलेश पाटील, विक्रांत खैरनार, किशोर देशमुख, उपसरपंच मंगेश जाधव, विनायक निकम ,मुख्याध्यापक विलास शिंदे, मुख्याध्यापिका संध्या परदेशी, कल्पना जाधव, अलकाताई बोरस्ते,प्रदीप पाटील, रघुनाथ गांगोडे, भारती पवार ,अर्चना पिंगळ, ग्रामसेवक शंकर माळोदे, विस्तार अधिकारी संजीवनी चौधरी, मंदाताई लांडे तलाठी गजकुमार पाटील, भिका शिंदे,मंडळ अधिकारी प्रीती अग्रवाल,महेश इंपाळ ,धनाजी वाघ यांची उपस्थिती होती.
“एसएनएफने हाती घेतलेले ग्रामीण भागात पुस्तकं पोहोचवण्याचे कार्य अतुलनीय असून अनेक दाते यासाठी पुढे येत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे.”
– अभिजित कुलकर्णी
“आई शिकली म्हणून आम्ही शिकलो ही सावित्रीमाईंची कृपा. वाचनालयासाठी मदत करू शकल्याने आम्ही कुटुंबीय अतीव समाधानात आहोत”
– डॉ. रविराज खैरनार.
Awankhed Library Inauguration With the Help of SNF
Social Networking Forum Nashik Dindori