नाशिक – अंतराळ विज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले नाशिकचे ज्येष्ठ इंजिनियर अविनाश शिरोडे यांना अमेरिकेच्या “नॅशनल स्पेस सोसायटी” या अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे “एक्सलन्स अवॉर्ड” या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हे उत्कृष्टता (excellence) पुरस्कार या समर्पित अंतराळ क्षेत्रातील व्यक्तींना समाजाच्या विशिष्ट सेवेसाठी या व्यक्तींचे योगदान ओळखण्यासाठी व साजरे करण्यासाठी सादर केले जातात. शिरोडे यांना “स्पेस एक्स्प्लोरेशन व स्पेस सेटलमेंट” ला चालना देणाऱ्या त्यांच्या विविध जागृती अभियान व उपक्रमांसाठी हा पुरस्कार दिला आहे.
अविनाश शिरोडे हे नॅशनल स्पेस सोसायटीच्या नाशिक इंडिया चाप्टर चे स्थापनेपासून अध्यक्ष आहेत. विख्यात अणुशास्त्रज्ञ पद्म विभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांचे शुभहस्ते २६ फेब्रुवारी २०१६ रोजी नाशिकच्या चाप्टर चे उद्घाटन करण्यात आले होते. या चाप्टर तर्फे विशेषता विद्यार्थ्यांसाठी “अंतराळ क्षेत्रातील शैक्षणिक व व्यावसायिक संधी”, अंतराळ क्षेत्रातील अद्यावत घडामोडी, अंतराळ क्षेत्रातील विविध संस्थांच्या पुढील पन्नास वर्षातील महत्वाकांशी उपक्रम याविषयी माहिती व उद्बोधन केले जाते.
दरवर्षी पुरस्कार वितरण सोहळा हा एनएसएसच्या “इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स” या कार्यक्रमात भव्य प्रमाणात केला जातो. यावर्षी कोविड मुळे सगळेच कार्यक्रम रद्द झाल्याने हा पुरस्कार वितरण सोहळा इंटरनेट द्वारे ऑनलाइन कार्यक्रमात मागच्या आठवड्यात करण्यात आला.
नाशिक चाप्टर तर्फे दरवर्षी “जागतिक अंतराळ सप्ताह” भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमासाठी अंतराळ क्षेत्रातील ख्यातनाम शास्त्रज्ञ यांची भाषणे व सादरीकरण आयोजित केले जाते. कोविड महामारी मुळे मागच्या वर्षी हा संपूर्ण कार्यक्रम ऑनलाइन जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला होता. त्यासाठी इस्रोचे माजी चेअरमन श्री किरण कुमार व सॅटॅलाइट सेंटरचे माजी डायरेक्टर डॉ. अण्णादुराई यांना व इतर पाच दिवस नासाचे ख्यातनाम शास्त्रज्ञ यांचे सादरीकरण आयोजित केले होते.
नाशिक चाप्टर ला यापूर्वीही २०१८ मध्ये “चाप्टर एक्सलन्स अवॉर्ड, २०१९ मध्ये “स्पेशल मेरिट अवॉर्ड फॉर वर्ल्ड वाईड कम्युनिकेशन” २०२० मध्ये “डेव्हिड डनलॉप आंतरराष्ट्रीय पुरस्कार” असे सलग तीन वर्ष पुरस्कार मिळाले होते. यावर्षी श्री शिरोडे यांना वैयक्तिक पातळीवर “एक्सलन्स अवॉर्ड” मिळाला आहे.
अविनाश शिरोडे यांची एनएसएस च्या संचालक मंडळावर मागील वर्षी निवड झालेली आहे. भारतातील व्यक्तीला प्रथमच हा सन्मान मिळाला आहे. एनएसएस ही एक स्वतंत्र शैक्षणिक व ना-नफा कार्य करणारी संस्था आहे जी मानवतेच्या उन्नतीसाठी आणि पृथ्वीच्या पलीकडे अवकाशात इतर ग्रहांवर सभ्यतेच्या विस्तारासाठी व विपुल संसाधनांच्या शोध व वापरासाठी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राला समर्पित आहे. ही संस्था नासा व अमेरिकन सरकारला अंतराळ धोरणाबाबत सल्ला देते.