टोकियो — येथे सुरू असलेल्या पॅरॉलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाज आणि सुवर्णपदक विजेती अवनी लेखरानं ऐतिहासिक कामगिरी करत वैयक्तिक कांस्यपदक पटकावले आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच १ स्पर्धेत अवनीने (४४५.९) कांस्यपदक मिळविले. चीनची झांग क्यूपिंग (४५७.९), जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले आहे. भारताला एकाच स्पर्धेत दोन पदके मिळवून देणारी ती पहिली अॅथलिट ठरली आहे.
अवनीने सोमवारी नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात २४९.६ गुणांसह सुवर्णपदक मिळविले होते. पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भारताच्या इतिहासातील हे पहिले सुवर्णपदक होते.पात्रता फेरीत अवनी लेखरा ११७६ गुणांसह दुसर्या स्थानावर होती. पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आता १२ पदके आली आहेत. त्यामध्ये दोन सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदके मिळाली आहेत. पॅरॉलिम्पिकमध्ये भारतीय संघाची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. रियो पॅरॉलम्पिकमध्ये (२०१६) भारताने दोन सुवर्णपदकांसह ४ पदके जिंकली होती.
पंतप्रधानांकडून कौतुक
दरम्यान, पॅरॉलिम्पिकमध्ये अवनीने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अवनीला शुभेच्छा देणारे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच अवनीच्या आजच्या कामगिरीचे नेमबाज अभिनव बिंद्राने कौतुक केले आहे. अभिनवने ट्विट करून तिच्या वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.