इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसऱ्याला ठाकरे आणि शिंदे यांचे दोघांचे मेळावे झाले. या मेळाव्यात संगीतकार, गायक अवधूत गुप्ते यांनी शिंदे यांच्या बीकेसी येथील मेळाव्यात गीत गायले. मात्र, शिवसेना गीत गाणाऱ्या अवधूत गुप्ते यांनी शिंदे यांच्या मेळाव्यात गाणे गायल्याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच अवधूत गुप्ते आता शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. मात्र, स्वतः अवधूत गुप्ते यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अवधूतसोबतच शिंदे यांच्या मेळाव्याला नंदेश उमप, स्वप्निल बांदोडकर आदी गायकही उपस्थित होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अवधूतने याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यंदाचे दोन्ही मेळावे आरोप, प्रत्यारोप, टोलेबाजीमुळे प्रचंड रंगले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेनेचं नवं गाणं प्रदर्शित केलं. अवधूत गुप्तेने हे गाणं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात गायलं. त्यामुळे तो शिंदे गटात गेल्याच्या चर्चा रंगल्या. अखेर अवधूतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अवधूत गुप्ते म्हणतो की, रसिक मायबाप, दरऱ्यानिमित्त बीकेसीवर झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आमंत्रणानुसार केवळ एक गायक म्हणून दोन गाणी सादर केली. या पार्श्वभूमीवर मी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. तसं तर माझ्याकडे अद्याप कोणत्याही पक्षाचं साधं प्राथमिक सदस्यत्व पण नाही. तरीही सर्वांनी मी शिंदे गटात गेल्याचे सांगितलं. मी कोणत्याही पक्षात किंवा गटात प्रवेश केलेला नाही. तुम्ही माझा प्रेक्षकवर्ग, चाहते, फॉलोअर्स हे माझे मायबाप आहात. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचं स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो. मी याआधीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरुन माझी कला सादर केल्याचे तुम्ही जाणताच…माझ्या लेखी हा विषय इथेच संपला!”. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक कार्यक्रमात अवधूत दिसला आहे. त्यामुळे त्याच्या राजकारणातील प्रवेशावर चर्चा रंगल्या.
Singer Avadhoot Gupte Clarify on Shinde Group Join
Entertainment Shivsena