पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाटा कंपनीने दोन सीएनजी सिलेंडर असलेली देशातील पहिली कार लॉन्च केली आहे. टाटाच्याच जुन्या प्रिमीयम हॅचबॅक Altroz कारचे हे सीएनजी मॉडल असून त्याचे बुकींगही सुरू झाले आहे. त्यामुळे आता तुम्ही जर नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टाटाची ही नवी गाडी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
मारुती कंपनीने बलेनो कार सीएनजीमध्ये उपलब्ध करून दिल्यानंतर मार्केट त्या दिशेने वळले होते. पण आता टाटाने तब्बल दोन सीएनजी लावून उत्तम मायलेज आणि आकर्षक लुकसह अल्ट्रॉजचे नवे मॉडेल लोकांना दिले आहे. ड्युअल सिलींडर तंत्रज्ञान असलेली ही देशातील पहिलीच कार असेल, हे विशेष. कंपनीने या कारमध्ये १.२ लिटर रेव्होट्रॉन बाय-फ्युअल इंजिन दिले आहे. जे पेट्रोल आणि डिझलमध्ये वेगवेगळ्या पॉवरमध्ये परफॉर्म करत. ही कार २२ ते २५ किलोमीटरचा मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. प्रत्येकी ३० लिटरचे दोन सीएनजी टँक असल्यामुळे या कारमधील बुट स्पेस वाढविण्यात आली आहे. जवळपास २१० लिटरचा बूट स्पेस मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. या कारमध्ये असा सनरूफ टाटाने उपलब्ध करून दिला आहे, जो आवाजाने ऑपरेट होतो. तसेच सेफ्टी फिचर्समध्ये कुठेच तडजोड करण्यात आलेली नाही.
साडेसात लाख रुपये किंमत
कंपनीने या कारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम फिचर्स दिले आहेत. कारची किंमत ७ लाख ५५ हजार रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. जवळपास ६ व्हेरियंटमध्ये ही कार विकली जाणार आहे. ट्विन सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञान, वायरलेस चार्जर, सनरुफ, एअर प्युरिफायर यासारखे आकर्षक फिचर्सही यात आहेत.