इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मैदानावर कायम आक्रमक असलेले आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स (वय ४६) यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. टाउन्सविले येथे शनिवारी रात्री कारचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांतच अँड्र्यू सायमंड्स यांचा मृत्यू झाल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटसह त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अकरा वाजेच्या सुमारास अॅलिस रिव्हर ब्रिजजवळ हर्वो रेंज रोडवर सायमंड्स यांची कार जात होती. कारचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या खाली उलटली. आपत्कालीन सेवेअंतर्गत त्यांच्यावर उपचार करण्यात आले परंतु त्यांचा जीव वाचू शकला नाही. या प्रकरणी फॉरेन्सिक क्रॅश युनिट तपास करत आहे. सायमंड्स यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला असून, सांत्वन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून सायमंड्स १९८ एकदिवसीय (५०८८ धावा), २६ कसोटी (१४६२ धावा) आणि १४ टी ट्वेंटी सामने (३३७ धावा) खेळले होते. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यांनी एकूण १६५ गडी बाद केले होते. २००३ साली विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात ते सहभागी होते. या दोन वर्षात ऑस्ट्रेलियन संघाने एकही सामना न गमावता रिकी पाँटिंग यांच्या नेतृत्वाखाली एकामागून एक स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी सायमंड्स यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. नाइट नेटवर्क वृत्तवाहिनीशी बोलताना बॉर्डर म्हणाले, की अँड्र्यू नेहमीच चेंडू प्रेक्षकांमध्ये मारून चाहत्यांचे मनोरंजन करत होता. एकाप्रकारे तो जुन्या काळातील क्रिकेटर होता. सायमंड्स यांनी नुकतेच फॉक्स स्पोर्ट्ससाठी वाहिनीचे समालोचक म्हणून काम केले होते. बिग बॅश लीगमध्येही ते नेहमीच समालोचन करतात.
मंकी गेट प्रकरण
भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग यांच्यासोबत २००८ साली झालेल्या मंकी गेट प्रकणानंतर अँड्र्यू सायमंड्स यांचे करिअर समाप्त झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणानंतर त्यांना दारूचे व्यसन लागले, त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट व्यवस्थापनाने त्यांच्याशी पुन्हा करार केला नाही. २००७-०८ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. तेव्हा हा वाद निर्माण झाला होता. मालिकेतील दुसरा कसोटी सामना सिडनी खेळण्यात आला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यादरम्यान हरभजन सिंग आणि सायमंड्स यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर हरभजन सिंगने सायमंड्सवर वंशभेदाची टिप्पणी केल्याची तक्रार रिकी पाँटिंग यांनी केली होती. हरभजन सिंग यांनी सायमंड्स यांना माकड (मंकी) असे संबोधले होते, असा आरोप करण्यात आला होता.
तीन खेळाडू गमावले
ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी गेले दोन महिने खूपच दुःखद ठरले आहेत. मार्च २०२२ पासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वाने आतापर्यंत तीन क्रिकेटपटू गमावले आहेत. ४ मार्च रोजी माजी क्रिकेटपटून शॉन मार्श (वय ७४) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. २२ मार्च रोजी फिरकीचे जादूगार शेन वॉर्न (वय ५२) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. आणि १४ मे राजी अँड्र्यू सायमंड्स यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.