नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेक विद्यार्थी दरवर्षी ऑस्ट्रेलियात जात असतात. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या एका निर्णयाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसणार आहे. ऑस्ट्रेलियाने पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांना बंदी घातली आहे. यामुळे या राज्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणाची दारे बंद झाली आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून व्हिसा बनविण्याचा प्रकार वाढला आहे. अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. परिणामत: ऑस्ट्रेलिया सरकारने कठोर पावले उचलत थेट काही राज्यातील भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गृह विभागाने व्हिसा फ्रॉडसंबंधीची माहिती दिली आहे. या विभागाने दिलेल्या अहवालानुसार, भारतातून येणाऱ्या प्रत्येक चार विद्यार्थ्यांपैकी एकाचा व्हिसा अर्ज हा बनावट असतो.
वेस्टर्न सिडनी विद्यापीठ आणि फेडरशेन विद्यापीठाने याच अहवालानंतर भारतातील सहा राज्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे. या सहा राज्यांमधून जर व्हिसाचे अर्ज आले तर त्यांचा विचार होऊ नये असे निर्देश या दोन्ही विद्यापीठांनी दिले आहेत. १९ मे रोजी जारी केलेल्या एका पत्रात या विद्यापीठांनी हे म्हटलं आहे बनवाट व्हिसा प्रकरणं समोर येत आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांना व्हिसा देऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे.
मोदींच्या दौऱ्यापूर्वी बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी तेथील सरकारने भारतीय विद्यार्थ्यांवर बंदी आणली आहे. तेथील कोवेन विद्यापीठ, टॉरेंस विद्यापीठ आणि साऊदर्न क्रॉस या विद्यापीठांनीही अशाच प्रकारे बंदी घातल्याची माहिती आहे.
Australia University Indian 6 State Students Ban