इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह करणे आजही कठीण मानले जाते. अनेक तरुण-तरुणींचे एकमेकांवर प्रेम जडल्यानंतर एक तर ते पळून जावून लग्न करतात किंवा लग्नच करत नाहीत. समाजाविरोधात जाऊन लग्न करणे अनेकांना महागात पडले आहे. आंतरजातीय विवाहाला विरोध असल्याने अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु काही ठिकाणी जाती-धर्माचे बंध तोडून लग्न लावून दिले जातात. असाच एक प्रयत्न बिहारमध्ये यशस्वी झाला आहे. येथे नववर बिहारचा आहे आणि वधू आहे ऑस्ट्रेलियाची.
बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील कुकुढा गावातील तरुण जयप्रकाशच्या प्रेमात पडलेली ऑस्ट्रेलियाची रहिवासी व्हिक्टोरिया स्वतःला भाग्यवान समजत आहे. कारण दोघांनीही एकमेकांशी लग्न केले आहे. बक्सर येथील एका मंगल कार्यालयात २० एप्रिल रोजी हिंदू रीतीरिवाजाने त्यांचे लग्न झाले. कुकुढा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदलाल सिंह यादव यांचे जयप्रकाश यादव हा ज्येष्ठ सुपूत्र आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण पूर्ण करून जयप्रकाश तिथेच नोकरी करत आहे. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे आनंदात आहेत.
जयप्रकाश याने सन २०१९ ते २०२१ पर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेतले. तो आता एमएस सिव्हिल इंजिनिअर म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला आहे. शिक्षण सुरू असताना जयप्रकाशचे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील जिलॉन्ग येथील रहिवासी व्हिक्टोरियावर प्रेम जडले. व्हिक्टोरियाचे वडील स्टिव्हन टॉकेट आणि आई अमेंडा टॉकेटसुद्धा व्हिक्टोरियासोबत कुकुढा गावात आले आहेत.
व्हिक्टोरियाचे वडील स्टिव्हन टॉकेट यांना बिहारी संस्कृती खूपच आवडली आहे. येथील संस्कृती पाहून त्यांना खूपच आनंद झाला. मुलीच्या हातावर मेहंदी पाहून ते खूप आनंदीत झाले. त्यांनी कन्यादानाचा विधीही उत्सुकतेने जाणून घेतला. मुलगी बिहारी जावयासोबत आनंदीत राहील, असा विश्वास त्यांना वाटतो.
जयप्रकाशचे वडील नंदलाल यांनीही आनंदाने दोघांचे लग्न लावून दिले. कुटुंबीयांकडून जयप्रकाशच्या प्रेमाबद्दल कळाल्यानंतर ते विवाहाल नकार देऊ शकले नाही. फक्त हे लग्न गावातील रीतीरिवाजानुसार होईल असे त्यांना सांगितले. व्हिक्टोरियाचे कुटुंबीयही आनंदाने ही अट मान्य केली. लग्नानंतर वधूकडील सर्व मंडळी आनंदीत झाल्यानंतर नंदलाल यादव यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला. ग्रामस्थांसह नातेवाईकही त्यांना शुभेच्छा देत असल्याचे ते सांगतात. यानिमित्त शेजारच्या गावातील ग्रामस्थ परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी येत आहेत.
साता समुद्र पार करून आपले प्रमे मिळवण्यासाठी बक्सर जिल्ह्यातील कुकुढा गावात पोहोचलेली व्हिक्टोरिया सध्या मेलबर्नमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. पाच भाऊ आणि दोन बहिणींमध्ये व्हिक्टोरिया सर्वात लहान आहे. तिचे आई-वडील या लग्नावर खूपच आनंदीत असून बिहारी संस्कृती समजवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.