मुंबई (इंडिया दर्पम वृत्तसेवा) – संघर्ष कधीच वाया जात नाही. त्याचं फळ कधी ना कधी मिळतच. आवश्यक असतो तो फक्त संयम. औरंगाबादच्या एका तरुणीने नोकरीसाठी दाखविलेला संयम आणि तिने केलेला संघर्ष आज याची खूप मोठी प्रचिती देत आहे. तीन वर्ष नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या तरुणीला अशी संधी मिळाली की सर्व स्तरावरून तिचं कौतुक होत आहे.
मुळची औरंगाबादची तृप्ती शेटे ही ती भाग्यवान तरुणी आहे. तृप्तीनं असं काय केलं की, तिच्या पाठिवर कौतुकाची थाप पडत आहे. मुंबई मेट्रोमध्ये एकूण ९१ पायलट असून त्यात २१ महिलांचा समावेश आहे. या २१ महिलांमध्ये तृप्तीही आहे. अवघे २७ वर्षे वय असलेल्या तृप्तीने आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, या साऱ्यांना मेट्रोमधून सफर घडवली आहे. गुरुवारी पंतप्रधान मुंबईत होते. त्यांनी मेट्रोचे उद्घाटन केले आणि मेट्रोनेच प्रवासही केला. ज्या मेट्रोने मोदींनी सफर केली, त्याचे सारथ्य स्वतःच तृप्ती करत होती.
दडपण होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मेट्रोतून सफर करणार, हे मला माहिती होते. खूप नर्व्हस नव्हते, पण थोडं दडपण होतं. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. कारण देशाच्या पंतप्रधानांना मेट्रोची सैर करण्याची जबाबदारी माझ्यावर होती, या शब्दांत तृप्तीने आपली भावना व्यक्त केली.
तीन वर्षे संघर्ष
इंजिनियरींग झाल्यानंतर तृप्तीला तीन वर्षे नोकरीसाठी संघर्ष करावा लागला. पण म्हणतात ना, कष्ट करणाऱ्याला त्याचं फळ मिळतच. तिची परिस्थिती तीन वर्षे वाईट होती, पण मेट्रोमध्ये ९१ पायलट्समध्ये तिचा क्रमांक लागला आणि तिचं नशीबच पालटलं. तृप्तीने इलेक्ट्रिकल इंजिनियरींग केले असून २०२० मध्ये हैदराबादमध्ये मेट्रो पायलटचे प्रशिक्षणही घेतले आहे.
Aurangabad Trupti Shetye Mumbai Metro Pilot