औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात सर्वांत मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे. याच प्रश्नातून अनेक प्रश्न आणि समस्या निर्माण झाल्या आहेत. औरंगाबादमध्ये त्याचं जीवंत चित्र बघायला मिळत आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या अर्जांमध्ये इंजीनीयर्सचेही अर्ज असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी लागेल, या आशेवर मुलं स्वतः किंवा त्यांचे पालक इंजीनीयरींगचा मार्ग निवडतात. पाच वर्षाचे इंजीनीयरिंग, त्यानंतर काही दिवस एखादा चांगला टेक्नीकल कोर्स आणि मग बड्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी, असं स्वप्न मुलांनी आणि पालकांनी बघितलेलं असतं. मात्र वास्तव वेगळच आहे. औरंगाबाद येथे ३९ शिपाईपदांसाठी तब्बल ५ हजार ७२५ अर्ज आलेले आहेत आणि यात ४० अर्ज अभियंत्यांचे आहेत. याशिवाय १२ महिलापदे भरणार आहेत. त्याकरिता दीड हजारांहून अधिक अर्ज आलेले आहेत. औरंगाबाद येथे सध्या पोलीस शिपाईपदासाठी शारीरिक चाचणी सुरू आहे. या पदासाठी खरी पात्रता केवळ बारावी पास एवढीच लागते. पण अर्जांची छाननी केल्यानंतर माहिती पडले की, यामध्ये उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे.
हे तर काहीच नाही
चाळीस इंजीनीयर्स शिपाईपदाच्या शर्यतीत उतरले आहेत, हेच ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल तर आणखी मोठा धक्का पुढे आहे. कारण एकूण दीड हजार अर्ज हे उच्चशिक्षितांचे आहेत. आणि यात बीएचएमएस एमडी, एमबीए, वकील यांचाही समावेश आहे. एक बीएचएमएस एमडी, २५ बी. टेक, ४० इंजीनीयर्स, १५ एमबीए, २०५ बीकॉम, २ वकील, ४०७ बीएससी, ९५ एमए आणखी अशी बरीच लांबलचक यादी आहे. विशेष म्हणजे शिपाईपदासाठी भरती सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षितांचे अर्ज येणं, ही नवी बाब नाही. पण तरीही त्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Aurangabad Police Recruitment Highly Educated Applications
Employment Job Vacancy