औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण मिळाले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमने राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या जाहीर सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोलिसांनी कलम १४४ लागू केले होते. पोलिसांनी काही अटी-शर्तींवर त्यांच्या सभेला परवानगी दिली आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, औरंगाबाद येथील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले आहे. शहरात शांतता आणि सद्भभावना कायम राहण्याच्या प्रयत्नांतर्गत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी पुणे दौरा आटोपून शनिवारी सकाळी राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील ध्वनिक्षेपक हटविण्यासाठी अंतिम इशारा दिला होता.
राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यासाठी पोलिसांनी १५ अटी ठेवल्या आहेत, असे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, राज ठाकरे यांनी अनेकदा आपले मत बदलले आहे. त्यावर त्यांनी पी.एचडी. केली पाहिजे, असा टोला शिवेसना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तर राज यांच्या सभेमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपसोबत युती करण्याच्या शक्यतेवर मनसे नेत्यांनी सध्या तरी नकार दिला आहे. राजकारण काहीही होऊ शकते. परंतु सध्या तरी भाजपसोबत युती करण्यासाठी कोणतीच चर्चा झालेली नाही, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे. मनसेसोबत युतीचा कोणताही औपचारिक प्रस्ताव नाही, तसेच त्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.