इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या महिन्यात टोमॅटो उत्पादकांची लॉटरी लावणारा टोमॅटो आता मात्र रुसला आहे. गेल्या महिन्यापर्यंत अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोने लखपती केले. आता मात्र, टोमॅटोचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. भाव कमालीचे घसरल्याने संतप्त शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून टोमॅटोचा क्रेट पेटवून दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हे अतिशय दुःखद चित्र आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रमी भावाने विकला. पण आता त्याला कवडीमोल दराने व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करावे लागत आहे. शेतमाल आणि जीवनावश्यक वस्तू यांच्या बाजारभावाबाबत हे सरकार अजिबात गंभीर नाही. ग्राहक आणि उत्पादक यांच्या हिताचा सुवर्णमध्य साधण्यासाठी शासनाने काम करणे अपेक्षित आहे परंतु सरकार निवडणूकीचे तात्कालिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी वर्गाची क्रूर थट्टा करीत आहे. हि अतिशय दुर्दैवी बाब आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
बघा हा व्हिडिओ
पिंपळगावातही टोमॅटो फेकले
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोचे दर चालू सप्टेंबर महिन्यात अक्षरशः १००ते २५०रुपये प्रति क्रेटस पर्यंत घसरल्याने उत्पादक चिंतेत आहे. मंगळवारी पिंपळगाव बाजारसमितीत मोहाडी येथील शेतकऱ्याच्या टोमॅटोस अवघा १०० रुपये प्रति क्रेटस प्रमाणे बाजारभाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यानी बाजारसमितीच्या आवारात टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव बाजार समितीत गेल्या ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी टोमॅटोस प्रति क्रेटस २६५१ रुपयांचा दर मिळाल्याने अनेक टोमॅटो उत्पादकांना वाढत्या दराचा काही अंशी लाभ मिळाला. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक उभे केले असताना त्याच ऑगस्ट महिना अखेर टोमॅटोचे बाजारभाव ५००ते ७०० प्रति क्रेटस पर्यंत हळूहळू खाली ओरसल्याने शेतकऱ्यांच्या मनात बाजारभाव टिकून राहावी अशी आशा कायम असतानासप्टेंबर महिना प्रारंभी पासून बाजारभाव ५००रुपये प्रति क्रेटसपर्यन्त खाली उतरत जवळ १०० ते २५० पर्यंत येऊन ठेपल्याने या तुटपुंज्या दरामुळे साधी मजुरी देखील सुटणारी नसल्याने संतप्त शेतकऱ्यानी पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो फेकून आपला रोष व्यक्त केला आहे.
अवघा १०० रुपये प्रति क्रेटस भाव
पाच लाख कर्ज काढून टोमॅटो पिकाची लागवड केली. निर्यातक्षम दर्जाचे टोमॅटो पाणी नसताना टँकरने पाणीपुरवठा करून पिके जगविले. आज अवघा १०० रुपये प्रति क्रेटस भाव मिळाल्याने अतीव दुःख होत आहे.
हेमंत पाटील, शेतकरी, मोहाडी
Aurangabad Farmer Angry Tomato Rates Reduced Fir Burn
Box Crate Agriculture Lasur Chhatrapati Sambhajinagar