औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा एकदा मैत्रीची साद घातल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मराठावाडा मुक्तीसंग्रामानिमित्त झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केल्याने शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार का या चर्चांना काल उधाण आले. आजही ही चर्चा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार सुरुच असून त्यांना सेना – भाजप एकत्र येणार असल्याचे वाटत आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्याने यावर चांगलीच चर्चा रंगली होती. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब तसेच इतर शिवसेना नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. परंतु शिवसेना नेत्यांनी मात्र भाजपसोबत पुन्हा एकत्र येण्याच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनैसर्गिक आघाडी फार काळ टिकून राहात नाही. महाराष्ट्राचे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांना तसे वाटले असेल, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. महाविकास आघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्या वक्तव्याला मी फारसे महत्त्व देत नाही. ते राज्याचे प्रमुख आहे. त्यांनी काय बोलावे, काय बोलू नये हा त्यांचा प्रश्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना थट्टा मस्करी करण्याची सवय आहे. भाजपनेत्यांचा तणाव कमी करण्यासाठी ते असे बोलले असतील. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
यापूर्वीही झाली चर्चा
शिवसेना-भाजप युतीबाबत तर्कवितर्क लढविण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जूनमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ४५ मिनिटे वैयक्तिक चर्चा केली होती. पंतप्रधान मोदी यांच्याशी आमचे शत्रुत्व नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्या वेळी दिली होती. त्यामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याची अटकळ बांधण्यात आली होती.