इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश आणि माजी पत्रकार शाज किरण यांच्यातील संभाषणाची ऑडिओ टेप समोर आली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि सीपीआय (एम) राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांचा निधी बिलिव्हर्स चर्चच्या माध्यमातून अमेरिकेत पोहोचत असल्याचा आरोप या टेपमध्ये करण्यात आला आहे. स्वप्नानेही शुक्रवारी पलक्कडमध्ये पत्रकार परिषद घेऊन मीडियाला ही नवी माहिती दिली आहे. आरोपी स्वप्ना नुकतीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आली आहे.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन, त्यांची पत्नी कमला आणि त्यांची मुलगी वीणा यांनी चलन आणि सोन्याची तस्करी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऑडिओ टेपमध्ये, स्वप्ना ही विजयन आणि बालकृष्णन या दोघांचीही निकटवर्तीय आहे आणि त्यांचे पैसे बिलीव्हर्स चर्चच्या माध्यमातून अमेरिकेत पाठवले जात आहेत असे किरणला सांगत आहे. बिलीव्हर्स चर्चचे मुख्यालय पठाणमथिट्टा जिल्ह्यातील तिरुवाला येथे आहे. त्यामुळे आता या चर्चचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री विजयन यांच्याबद्दल मीडियामध्ये गंभीर गोष्टी बोलून स्वप्नाने चूक केली, असंही किरणने म्हटलं होतं. आपल्या मुलीचे नावही या प्रकरणात ओढण्यात आल्याने ते संतापले आहेत. किरण स्वप्नाला पैसे घेऊन प्रकरण उकरून काढण्याचा सल्ला देतो.
केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन यांनी आरोप केला की सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीएफ) सरकार मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या विरोधात पुरावे देण्यास तयार असलेल्या लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांना पुरावे द्यायचे आहेत त्यांच्यावर नवीन गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य एका आरोपीविरुद्ध सरकारने दक्षता चौकशी करून आपले अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री विजयन यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसने केरळभर निदर्शने केली आहेत. कन्नूर पोलिसांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांच्या विरोधात नोटीस बजावली, पक्षाच्या मोर्चादरम्यान हिंसाचार होण्याची शक्यता आहे.